Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमरावती : दारूच्या नशेत आईच्या अंगाखाली दबल्याने बाळाचा मृत्यू

अमरावती : दारूच्या नशेत आईच्या अंगाखाली दबल्याने बाळाचा मृत्यू
 

जेमतेम २१ दिवसांचे ते बाळ होते. त्याने अजून पूर्णपणे जग पाहिलेही नव्हते. दरम्यान, ज्या माउलीने त्याला जगात आणले त्याच मातेच्या चुकीने त्याला जग सोडावे लागले. बाळाची आई दारूच्या नशेत होती. रात्रीच्या सुमारास दूध पिताना ते बाळ तिच्या अंगाखाली दबले. यात बाळाचा श्वास गुदमरला आणि त्याचा मृत्यू झाला. समाजमन सुन्न करणारी ही घटना धामणदस गावात घडली असून बेनोडा पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे बाळाच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एका २५ वर्षीय महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पहिलेच बाळंतपण असल्याने ती प्रसूतीनंतर बाळासह माहेरी धामणदस येथे होती. दरम्यान, ६ सप्टेंबरला रात्री ती बाळाला घेऊन खाटेवर झोपली. तिने दारू घेतली होती. त्यामुळे आपल्याच पोटचा गोळा अंगाखाली आला हे तिला सकाळपर्यंत लक्षात आले नाही. सकाळी बाळ रडत नव्हते. त्यामुळे बाळ दगावल्याचे कुटुंबीयांना समजले. त्यानंतर तत्काळ ही माहिती बेनोडा पोलिसांना देण्यात आली.

बाळाच्या शरीरावर कोणतेही व्रण नव्हते. मात्र, तोंडातून दूध बाहेर आले होते व नाकातून रक्तस्त्राव झाला होता. पोलिसांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी पाठवला. अहवालात बाळाचा मृत्यू श्वास गुदमरल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी बाळाच्या आईचीसुद्धा वैद्यकीय तपासणी केली. ती झोपली होती तिथे तिने ओकारी केल्याचे दिसत होते. दारूचा वास येत होता. यामुळे ती घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत होती हे समोर आले. बाळाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा गुन्हा आईविरुद्ध दाखल केला असल्याची माहिती ठाणेदार तथा सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.