Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! शाळेची भरभराट व्हावी म्हणून दुसरीच्या मुलाची गळा दाबून हत्या; काळी जादू असल्याचा पोलिसांना संशय

धक्कादायक! शाळेची भरभराट व्हावी म्हणून दुसरीच्या मुलाची गळा दाबून हत्या; काळी जादू असल्याचा पोलिसांना संशय
 

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका शाळेत दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हाथरसमध्ये मोठी खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे कुटुंबीय शाळेत पोहोचल्यानंतर शाळेचे संचालक पळून गेले. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. या प्रकरणात पोलिसांनी शाळा संचालकासह ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

काही वृत्तानुसार, शाळेच्या भरभराटसाठी इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा काळ्या जादूचा विधी करत बळी देण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, ही योजाना फसल्यामुळे त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शाळेचे नाव रोशन करण्यासाठी काळी जादू करत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. हे संपूर्ण प्रकरण हाथरसच्या सहापौ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रसगव्हाण गावामध्ये घडले आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, शाळा मालकाच्या वडिलांना जादूटोणा येत असल्याचा दावा केला जात आहे. त्यांनीच ही मानव बलिदानाची योजना आखल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ६ सप्टेंबर रोजी एका दुसऱ्या मुलासोबत मानव बलिदानाची योजना आखली होती. मात्र, मुलाने पळ काढल्यामुळे ती योजना फसली. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी शाळेच्या पाठीमागील कूपनलिकेजवळ मुलाचा बळी देण्याच्या उद्देशाने आरोपीने पुन्हा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी जात असतानाच मुलाला जाग आल्यामुळे संशयितांनी घाबरून त्याचा गळा आवळून खून केला.

या घटनेनंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता शाळेतील कूपनलिकेजवळ अनुष्ठानाच्या वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे या गुन्ह्यामागे अंधश्रद्धा आणि जादूटोणा असल्याचा पोलिसांचा समज आहे. मुलाच्या शवविच्छेदन तपासणीत गळा दाबल्याची लक्षणे आढळून आली आहेत. दरम्यान, हा सर्व प्रकार ज्या शाळेत घडला ती शाळा आर्थिक अडचणीत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शाळेची भरभराट व्हावी, हा या हत्येमागील हेतू असावा आणि त्यातूनच मानवी बलिदानामुळे शाळेला यश मिळेल, असा समज आरोपींचा असावा, असा संशय पोलिसांना असून या दृष्टीने आता तपास सुरु आहे.
या संपूर्ण घटनेची माहिती देताना मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, “मला माझ्या मुलाच्या शाळेतून फोन आला होता. तेव्हा सांगण्यात आलं की, तुमच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे आणि तत्काळ शाळेत या. यानंतर मी शाळेत जात असतानाच मला पुन्हा फोन आला तुमच्या मुलाची प्रकृती बिघडली असून आम्ही त्याला सादाबादला घेऊन जात आहोत, असं सांगितलं. त्यानंतर आम्ही देखील त्यांच्या मागे गेलो. मात्र, त्यानंतर आम्ही सादाबादमध्ये गेलो त्यावेळी आम्हाला मुलाचा मृतदेह त्यांच्या गाडीत सापडला”, असं मुलाच्या वडिलांनी सांगितलं. दरम्यान, यानंतर पोलिसांनी शाळेच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतल्याची माहिती सांगण्यात आली आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.