विकेंड नाही! एक दिवस विश्रांती नाही! न थांबता काम करणाऱ्या २६ वर्षीय सीए तरुणीचा मृत्यू!
मुंबई : अर्न्स्ट अँड यंग (EY) कंपनीच्या पुणे कार्यालयात काम करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. कंपनीत रुजू झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात तिला प्राण गमवावे लागल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. कामाच्या तणावाने आपल्या लेकीचा बळी घेतल्याचा आरोप तिची आई अनिता ऑगस्टियन यांनी केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मूळची केरळची असणारी तरुणी सीए ॲना सेबॅस्टियन पेरायल हिच्यावर कंपनीने मान मोडेपर्यंत कामाचा भार टाकल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप कंपनीवर केला जात आहे. पेरायलची आई अनिता ऑगस्टिन यांनी कंपनीचे भारतातील प्रमुख राजीव मेमाणी यांना एक ईमेल स्वरुपात पत्र लिहिले आहे. या पत्रात तिच्या आईने कंपनीच्या कार्यपद्धतीवरुन कंपनीला खडे बोल सुनावले आहेत. कंपनीची मानवी हक्क व मूल्ये आणि आपल्या मुलीने अनुभवलेली वास्तविकता कशाप्रकारे पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.
काय लिहिले आहे पत्रात ?
तरुणीची आई अनिता ऑगस्टियन यांनी पत्रात लिहिले आहे की, 'मी हे पत्र एक दुःखी आई म्हणून लिहीत आहे, जिने आपले अनमोल मूल गमावले आहे. १९ मार्च २०२४ रोजी ती अर्न्स्ट अँड यंग (EY) कंपनीच्या पुणे शाखेत माझी मुलगी ॲना कार्यकारी म्हणून रुजू झाली. पण चार महिन्यांनंतर, २० जुलै रोजी जेव्हा मला ॲनाचे निधन झाल्याची बातमी मिळाली तेव्हा माझे जग उद्ध्वस्त झाले. ती फक्त २६ वर्षांची होती.
पहिलीच नोकरी असल्यामुळे ॲना खूप मेहनतीने काम करायची. कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती काळ- वेळ न पाहता खूप काम करायची. मात्र, याचा परिणाम तिच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर झाला. कंपनीत रुजू झाल्यानंतर काही दिवसातच तिला अस्वस्थपणा जाणवू लागला होता, झोप न येणे, मानसिक तणावासारख्या समस्या उद्भवू लागल्या होत्या. तरीही ती काम करत होती. तिला वाटायचे की खूप कष्ट, सतत काम करत राहणे हाच यश मिळवण्याचा मार्ग आहे. ॲनाच्या आईने असाही दावा केला की, कामाच्या ताणामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता. तिचा मॅनेजर क्रिकेट सामन्यांवेळी अनेकदा मीटिंगच्या वेळा बदलून दिवस संपताना कामे द्यायचा. यामुळे ताण वाढायचा, ती रात्री उशिरापर्यंत काम करायची, अगदी वीकेंडलाही. तिला श्वास घ्यायलाही वेळ दिला गेला नाही.. असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.या पत्रात एनाच्या आईने एका घटनेचाही उल्लेख केला आहे. एनाच्या वरिष्ठांनी एकदा रात्री एक काम तिला सोपवले जे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण होणे त्यांना अपेक्षित होते. त्यामुळे तिला विश्रांतीसाठी थोडाही वेळ मिळाला नाही. जेव्हा तिने मॅनेजरला अडचण सांगितली, तेव्हा तिला उत्तर मिळाले की, तू रात्री काम करू शकतेस, आम्हीही हेच करतो.ॲना कामावरून प्रंचड थकून घरी यायची. अनेकदा ती न जेवता, कपडे न बदलताच झोपून जायची. डेडलाइन पूर्ण करण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करत होती. ती लढणारी होती, ती सहज हार मानत नव्हती. आम्ही तिला नोकरी सोडायला सांगितले पण तिला शिकायचे होते, नवा अनुभव घ्यायचा होता. पण दबावाचा अतिरेक तिच्यासाठी खूप घातक ठरला, असेही एनाच्या आईने पत्रात लिहलं आहे.
पत्राच्या शेवटी अनिताने कंपनीला जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले की, 'नवीन आलेल्यांवर अशा कामाचे ओझे लादणे, त्यांना रात्रंदिवस काम करण्यास भाग पाडणे, अगदी रविवारीही…' ॲनाच्या मृत्यूने EY साठी एक वेक-अप कॉल म्हणून काम केले पाहिजे… मला आशा आहे की हे पत्र ज्या गांभीर्याने तुम्हाला पाठवले आहे तितकेच तुमच्यापर्यंत पोहोचेल…, असं ॲनाच्या आईने पत्रात म्हटलं आहे.
मृत्यूचे कारण काय?
ॲनाच्या मृत्यूच्या काही आठवडे आधी तिच्या छातीत दुखत असल्याचे सांगितले जात आहे. ॲनाच्या आईने या पत्रामध्ये पुढे असे सांगितले की, "६ जुलै रोजी पुण्यात माझी मुलीच्या सीए दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी मी माझ्या पतीसोबत पुण्याला गेले होते. त्यावेळी अचानक तिच्या छातीमध्ये दुखू लागले. त्यानंतर आम्ही तिला लगेच रूग्णालयात नेले होते. तिचा ईसीजी नॉर्मल होता. हृदयरोगतज्ज्ञांनी कमी झोप आणि अवेळी जेवणामुळे तिला हा त्रास झाल्याचे सांगून अँटासिड्स लिहून दिली, त्यामुळे आम्हाला खात्री झाली की हे फार गंभीर नाही. मात्र २० जुलैला माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी मला मिळाली. माझी मुलगी फक्त २६ वर्षांची होती. माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर कंपनीचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी तिच्या अंत्यविधीला उपस्थित नव्हता. माझ्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी कोणाकडे एक मिनिटही नव्हता?" असेही त्या म्हणाल्या. मात्र, ॲनाच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.