मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वांद्रे येथील मोहम्मद सईद यांनी वकील एजाज नख्वी यांच्यामार्फत ही केली याचिका दाखल केली आहे.
एकनाथ शिंदे आणि आमदार नितेश राणे मुस्लिमद्वेषी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे, आमदार नितेश राणे सातत्याने भडकाऊ भाषणे करणाऱ्यांची पाठराखण करतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय रामगिरी महाराज, हिंदू जनजागृती समिती, गुगल, ट्विटर, पोलीस महासंचालक आणि अन्य यांना देखील याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.
दरम्यान, मुस्लिमविरोधी भाषणे सोशल मीडियावरून काढून टाकावी. मुस्लिमांना टार्गेट करणारे मोर्चे, आंदोलने यांचे लाइव्ह टेलिकास्ट न करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत. मुस्लिमविरोधी भाषणे, मेसेज पसरवले जाणार नाहीत, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जावीत, अशा मागण्या या याचिकेतून करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मुस्लिमविरोधी रॅली आणि मोर्चांची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर निश्चित करावी. भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असंही मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नितेश राणेंच्या दौऱ्यामुळे अमरावतीत हायअलर्ट
भाजप आमदार नितेश राणे यांनी सध्या महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला आहे. आज त्यांचा मोर्चा अमरावतीत दाखल होणार आहे. यावेळी धार्मिक सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. अचलपूर-परतवाडा शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. अमरावती ग्रामीण क्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राणेंच्या दौऱ्यामुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, असा अहवाल पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.