अजितदादांची महायुतीतून 'एक्झिट'? अमित शहांनी खरे काय ते सांगूनच टाकलं...
राष्ट्रवादी काँग्रेसनं ( अजितदादा पवार ) गटानं महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी, यासाठी भाजप आणि शिवसेनेनेकडून ( शिंदे गट ) जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं.
जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार वेगळे झाले, तर भाजप आणि शिवसेनेला ( शिंदे गट ) अधिकाधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखली जात असल्याचा दावाही करण्यात येत होता. मात्र, अजितदादा महायुतीतून बाहेर जाणार की महायुतीतच राहणार? याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केलं आहे. अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतील राहिल, असं गृहमंत्री शाह यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मिळालेल्या अपयशामागे अजितदादांची महायुतीतील 'एन्ट्री' कारणीभूत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ( आरएसएस ) भाजपच्या नेत्यांना वारंवार सांगितलं होतं. तसेच, विधानसभेला तरी, अजितदादांनी संगत सोडावी, असा सल्ला 'आरएसएस'नं दिला होता.
अजितदादा बाहेर पडणार?
मात्र, महायुतीत अजितदादांची कोंडी करण्यासाठी अप्रत्यक्षपणे भाजप आणि शिवसेनेकडून ( शिंदे गट ) रणनीती आखली जात असल्याचं बोललं जाते. एकीकडे कट्टर हिंदुत्त्वाचा मुद्दा, तर दुसरीकडे विधानसभेला कमी जागा देऊन अजितदादांच्या राष्ट्रवादीची कोंडी करायची. जागावाटपाचं कारण देत अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अजितदादांचं महायुतीतून बाहेर पडणं भाजप आणि शिवसेना ( शिंदे गट ) पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे अजितदादांची महायुतीत कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात होते.
अमित शहांनी स्पष्टच सांगितलं....
महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा, अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतच राहणार असल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केलं. "अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीतच राहील. विधानसभा निवडणुकीत तीनही पक्ष एकत्रित निवडणूक लढतील," असं अमित शाह यांनी म्हटलं.
बंडखोरी सहन करणार नाही...
"महायुतीचे जागावाटप तीनही पक्षांच्या समन्वयातून होईल. एकदा का युतीचा उमेदवार ठरला की त्याच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे. काही जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागती. त्याठिकाणी आपल्या नेते, कार्यकर्त्यांनीही मनापासून काम करावे. बंडखोरी, गटबाजी अजिबात सहन करणार नाही," असा दमही अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना भरला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.