इडली खाताना श्वास गुदमरून ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तुमच्यासमोर एखाद्याचा घास अडकल्यास काय करावे, तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
ओणम हा मल्याळी लोकांचा सांस्कृतिक सण आहे, जो १० दिवस साजरा केला जातो. एका दुर्दैवी घटनेमुळे ओणम सणाला गालबोट लागले आहे. केरळमधील पलक्कड येथे इडली खाण्याच्या स्पर्धेदरम्यान श्वास गुदमरून ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, उपस्थितांनी इडली बाहेर काढून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना लक्षात घेता इडली खाताना घशात घास अडकल्यास श्वास गुदमरल्याची शक्यता आहे का आणि ते जीवघेणे ठरू नये यासाठी काय करू शकतो हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जेवताना घास अडकण्याची शक्यता का वाढते?
“आजकाल लोक टीव्हीवर आपले आवडते शो पाहात त्यांचे जेवण करतात, ज्यामुळे त्यांचे जेवणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे घास न चावताच गिळला जाण्याची शक्यता असते, परिणामी घास घशात अडकू शकतो”, असे डॉ. समीर गार्डे (Dr Samir Garde) यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. डॉ. गार्डे हे परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटल पल्मोनोलॉजी आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे संचालक आहेत.
इडली खाताना घशात घास अडकू शकतो का?
याशिवाय, “घास अडकण्याच्या बाबतीत इडलीचा पोतदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. इडली मऊ नसेल, ती नीट चावली नाही तर त्यामुळे एखाद्याचा घास अडकून श्वास गुदमरू शकतो, जे प्राणघातक ठरू शकते”, असे डॉ. रवी शेखर झा यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. डॉ. झा हे फरीदाबादच्या फोर्टिस एस्कॉर्ट्सचे पल्मोनोलॉजिस्ट आहेत.डॉ. गार्डे यांच्या मते, “इडल्या साधारणपणे कोरड्या असतात. विशेषतः जर त्या ताज्या नसतील, इडली मऊ नसेल किंवा कोरडी असेल तर घास चावणे आणि गिळणे कठीण होऊ शकते. सामान्यतः नेहमीपेक्षा मोठा घास घेतल्याने तो घशात अडकू शकतो, ज्यामुळे श्वास गुदमरतो किंवा उलट्या होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो. इडल्यांचे मोठे तुकडे घशातून जाण्यास त्रास होत असल्याने असे कोरडे पदार्थ चटण्यांबरोबर खाणे उपयुक्त ठरू शकते.”
हेमलिच युक्ती वाचवू शकते एखाद्याचे प्राण
“जेव्हा वायुमार्ग पूर्णपणे बंद होतो तेव्हा श्वास गुदमरणे हे प्राणघातक ठरू शकते किंवा गंभीर गुंतागुंत होऊ शकते, ज्यामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा मिळण्यास उशीर होतो. जर त्वरीत उपचार केले नाहीत तर त्यामुळे श्वास गुदमरणे , मेंदूचे नुकसान किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो. जर कोणी तुमच्यासमोर गुदमरत असेल तर हेमलिच युक्ती वापरून त्यांचे प्राण वाचू शकतात," असेही डॉ. गर्दे म्हणाले.
याबाबत डॉ. झा यांनी सहमती दर्शवली आणि सांगितले की, “घास अडकल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू रोखण्यासाठी तिथे उपस्थित व्यक्तीने ताबडतोब हेमलिच युक्ती वापरणे सुरू केले पाहिजे. हेमलिच युक्ती वापरून घशात अडकलेले अन्न काढून टाकण्यासाठी छातीचा मागचा भाग दाबला जातो,” असे डॉ. झा म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.