'10 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीस', चित्रा वाघ यांनी सांगितला दोन नेतृत्वातील फरक
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याला पुढे घेऊन जाण्याची ताकद असल्याचं भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
झी 24 तासच्या 'जाहीर सभा' या विधानसभा निवडणूक विशेष कार्यक्रमात बोलताना चित्रा वाघ यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील फरक सांगितला. शरद पवार यांचं उत्तुंग नेतृत्व आहे, विषयाची चांगली जाण आहे, गेली पन्नास वर्ष ते राजकारणात आहेत. पण ज्यावेळी शरद पवार राजकारणात होते, त्यावेळीच परिस्थिती वेगळी होती. त्यावेळचे प्रश्न आणि आताचे प्रश्न यात फरक आहे. राजकीय परिस्थितीही झपाट्याने बदलली आहे. शरद पवार अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. पण आताचं नेतृत्व पाहाल तर ज्याच्यात महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, ते म्हणजे एकमेव नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. दहा शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस उत्तुंग व्यक्तीमत्व
देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण भाजपात प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस हे एक उत्तुंग व्यक्तीमत्व आहे. त्यांनी मला आमदार केलं म्हणून हे सांगत नाही. मी दुसऱ्या पक्षातून आल्याने मला दोन नेत्यांमधला फरक कळतो. आधीच्या पक्षातील सर्वेसर्वांबरोबर काम केलं आहे, शरद पवारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालीय. नेता म्हणून कार्यकर्त्यांच्या मागे किती सक्षमपणे आणि ताकदीने उभं राहावं, याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
चित्रा वाघ यांनी सांगितला किस्सा
जाहीर सभा या कार्यक्रमांत बोलताना चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा एक किस्साही सांगितला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी खालत्या पातळीवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते वाचलं की संतापच यायवा हवा, त्यामुळे आपण मातोश्रीवर मोर्चा काढण्याचं ठरवलं, मोर्चाची माहिती देवेंद्र फडणवीस यांना कळली त्यांनी आपल्याला बोलावून मोर्चाबद्दल विचारलं. त्यानंतर त्यांनी मला थांबवत सांगितलं, तुमची लढाई मुख्यमंत्र्यांसोबत आहे, मग तुम्ही त्यांच्या घरी का जाता, तिथे त्यांचं कुटुंब राहातं, आपलं काम कोणाच्या कुटुंबाला त्रास देण्याचं नाही. ज्यांना जाब विचारायचा आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारा, पण कुणाच्या कुटुंबाला त्रास द्यायचा नाही हे देवेंद्र फडणवीस यांचं वाक्य होतं. ही गोष्टा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला खूप काही शिकवून गेली अंस चित्रा वाघ यांनी सांगितलं. एका अभ्यासू नेतृत्वाबद्दल काम करायला मिळतंय याचा मला अभिमान आहे, आणि म्हणून मला माझ्या नेत्याबद्दल अत्यंत आदरसुद्धा आहे. असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.