लखनऊ : फुगा म्हणजे लहान मुलांचा आवडता... मुलांसोबत कुठे फिरायला गेलात किंवा जत्रेत गेलात तर मुलं आवर्जून फुग्यासाठी हट्ट करतात. मुलांचा हट्ट पुरवायचा म्हणून पालकही आपल्या मुलांना फुगे देतात. पण हाच फुगा जीवघेणा ठरू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. एका फुग्याने लहान
मुलीचा जीव घेतला आहे. मुलीच्या आजोबांनी तिला प्रेमाने फुगा आणून दिला
होता. हाच फुगा तिच्या मृत्यूचं कारण ठरलं. यामागचं कारण डॉक्टरांनी
सांगितलं ते धक्कादायक आहे.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील ही धक्कादायक घटना आहे. फतुहान गावातील इम्रान अहमदची पत्नी नाज ही तिची 3 वर्षांची मुलगी सायरासोबत माहेरी गेली होती. नाजचे वडील म्हणजे सायराच्या आजोबांनी सायराला खेळण्यासाठी फुगा आणला. फुग्याच्या रूपात आपण आपल्या नातीच्या हातात मृत्यूच देत आहोत याची कल्पनाही त्या आजोबांना नव्हती.
घरातली सगळे लोक कामात व्यस्त होते, सायरा आजोबांनी आणलेल्या फुग्यासोबत खेळत होती. खेळता खेळता अचानक फुगा फुटला. फुगा फुटल्याचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकून घरातील सदस्य तिथं आले. तर सायरा जमिनीवर खाली पडली होती. फुगा फुटताच ती खाली पडली आणि नंतर तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
फुग्यामुळे कसा झाला सायराचा मृत्यू
आता फुग्यामुळे कुणाचा मृत्यू कसा काय होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. डॉक्टरांनी सायराच्या मृत्यूचं नेमकं कारण सांगितलं आहे. सायरा तोंडाने फुगा फोडण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा फुगा फुटला तेव्हा त्याचा एक तुकडा सायराच्या श्वासनलिकेत अडकला. यामुळे तिचा मृत्यू झाला.या प्रकरणानंतर मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ.सचिन म्हणाले की, अशी अनेक प्रकरणं समोर येतात. आपल्या मुलांसाठी फुगे किती धोकादायक असू शकतात याची लोकांना जाणीव नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.