अजित पवारांनी केलेल्या आरोपांना आर आर पाटलांच्या लेकीने दिलं उत्तर, म्हणाली 'नऊ वर्षं तुमच्या मनात...'
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अजित पवार यांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी थेट दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचा उल्लेख करत केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यासह पुन्हा एकदा सिंचन घोटाळा चर्चेत आला आहे. गृहमंत्री असताना आर. आर. पाटील यांनीच 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या फाइलवर स्वाक्षरी केल्याने आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं विधान अजित पवारांनी केलं आहे. यानंतर यावर प्रतिक्रिया उमटत असताना आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी आर आर पाटलांवर असे आरोप करणं दु:खदायक आहे. अजित पवारांच्या आरोपांमुळे कुटुंबीयांसह आबाप्रेमींना मोठं दुःख झाल्याची भावना स्मिता पाटलांनी व्यक्त केली आहे.
स्मिता पाटील नेमकं काय म्हणाल्या?
स्मिता पाटील यांना निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहता असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "आबांच्या पश्चात आमच्या कुटुंबावर, तासगाव-कवठे महांकाळमधील जनतेवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आमच्या आईने कधीही राजकारणात सक्रीय सहभाग घेतला नव्हता. पण आबा गेल्यानंतर मी आणि रोहित लहान असल्याने आईवर अनावधानाने ती जबाबदारी आली. 10 वर्षं अतिशय उत्तम पद्धतीने तिने कार्यभार सांभाळला. तो कारभार सांभाळत असताना रोहितने वेळोवेळी त्यांना मदत केली. एक बहीण आणि शरद पवार गटाची कार्यकर्ती म्हणून रोहित भरघोस मतांनी विजयी होईल असा मला विश्वास आहे".अजित पवारांच्या विधानाबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, "आम्हा कुटुंबीयांना ते ऐकून फार वाईट वाटलं. फक्त कुटुंबीयच नाही तर तासगाव कवठे महांकाळमधील जनता, महाराष्ट्रातील आबाप्रेमींना फार वाईट वाटलं. आबांना जाऊन साडे नऊ वर्षं झाली आणि आता अजित पवारांनी आता मनातील खदखद व्यक्त केली. आम्ही अजित पवारांकडे वडील या नात्याने पाहतो. आबा आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जातात. आबांवर भ्रष्टाचाराच एकही आरोप नाही".
अजित पवार फडणवीसांचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?
आर. आर. आबांनी आपला केसाने गळा कापला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा फाईल कशी तयार झाली याबद्दल तासगावमधील जाहीर सभेत भाष्य केलं. त्यावर आपली चौकशी करण्यासाठी आर. आर. आबांनी सही कशी केली याचा उलगडा अजित पवारांनी केला. आर. आर. पाटलांनी आपल्याला कामाला लावले, अशी खंत देखील अजित पवारांनी व्यक्त केली. "मला 70 हजार कोटींची भ्रष्टाचाराचा आरोप झाला. फाईल तयार केली. अजित पवारांची ओपन चौकशी करण्याची सही आर आर पाटील यांनी केली. वाईट वाटले. आपलं काही तर चुकलं असेल तर पण आपल्याला कामाला लावून गेला. त्या फाईलवर आबांनी केलेली. सहीबद्दल देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मला कोणी सही केली हे दाखवलं होतं," असं अजित पवार म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.