Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत भाजप करणार करेक्ट कार्यक्रम! अजितदादांना उमेदवारांसह 'या' दोन जागा गिफ्ट

सांगलीत भाजप करणार करेक्ट कार्यक्रम! अजितदादांना उमेदवारांसह 'या' दोन जागा गिफ्ट

सांगली : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 4 दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये जागा वाटपांमध्ये काही जागांवर अदलाबदली करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

भाजपने शरद पवारांना धक्का देण्यासाठी सांगलीत अजित पवारांना दोन जागा उमेदवारांसह देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, सांगलीत महाविकास आघाडीला लोकसभेत यश मिळाले. त्यानंतर आता आपल्या रणनीतिमध्ये भाजपने बदल केला असल्याचे दिसते. भाजप सांगलीतील दोन जागा अजित पवारांना उमेदवारांसह देणार आहेत.

कोणत्या जागा देणार?


भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तासगाव आणि इस्लामपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाला देणार आहे. सध्या या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुमन पाटील आणि जयंत पाटील हे आमदार आहेत. शरद पवारांच्या उमेदवाराला धक्का देण्यासाठी भाजपही खेळी खेळणार आहे.

भाजप का सोडणार जागा?


महायुतीच्या जागा वाटपात तासगाव आणि इस्लामपुर जागा अजित पवार गटाच्या कोट्यात जाणार आहेत.
मात्र ह्या दोन्ही जागांवर भाजपचे आयते उमेदवार राष्ट्रवादी घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तासगावमध्ये भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. तासगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या घड्याळाचा फायदा...


भाजपने या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे देण्यामागे निवडणूक चिन्हाचा विचार केला असल्याचे दिसून येते. तासगावमध्ये दिवंगत आर.आर. पाटील आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुमन पाटील या आमदार राहिले आहेत. तर, इस्लामपूरमध्ये जयंत पाटीलचे कायम वर्चस्व दिसून आले. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह घड्याळ मतदारांच्या मनात आहेत. तर, पक्ष फुटीनंतर शरद पवार यांच्याकडे तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह आले आहे. राष्ट्रवादीचं मतदारांमध्ये रुजलेलं घड्याळ चिन्ह या ठिकाणी फायदा देईल, असा भाजपचा होरा आहे. यामुळेच भाजपकडून राष्ट्रवादीला मतदारसंघासहीत उमेदवारांचही जोरदार गिफ्ट देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.