महिला मंडल अधिकाऱ्यासह दोघेजण 'लाचलुचपत'च्या जाळ्यात सात हजारांची लाच घेताना सांगली एसीबीने रंगेहाथ पकडले
तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. वाले यांनी बस्तवडे येथील एका व्यक्तीची एक नोंद घालण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान तडजोडीनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले होते. हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यासोबत बस्तवडे येथील एका खासगी व्यक्तिलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
बस्तवडे येथील एका व्यक्तीच्या व्यवहाराची नोंद घालण्यासाठी वाले यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित व्यक्तीने इतक्या पैशांची जुळणी होणार नाही, असे सांगितले होते. दरम्यान चर्चेनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर संबंधित तक्रारदाराने सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. वाले यांच्या विरोधात रीतसर तक्रार दिली. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाले यांच्या विरोधात वायफळे येथे सापळा लावला.
तक्रारदाराला पैसे घेऊन वाले यांच्याकडे पाठवण्यात आले. यावेळी वाले यांनी संबंधित कामासाठी सात हजार रुपये मागितले व घेतले. यावेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाले यांना रंगेहाथ पकडले. वाले यांच्यासह एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे यांच्या मार्गदर्शनाने धनंजय खाडे, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, सिमा माने, अजित पाटील, प्रितम चौगुले, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, अतुल मोरे, विना जाधव, चालक विट्ठल राजपुत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.