संभाजी भिडेंच्या दुर्गा माता दौड रॅलीत झळकले नथुराम गोडसेचे फोटो
संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दुर्गा माता दौड रॅली काढण्यात येते. नाशिक शहरातही दुर्गा माता दौड रॅली काढण्यात आली. विजयादशमीच्या निमित्ताने सकाळी ही रॅली काढली गेली. या रॅलीत भगव्या
टोप्या, भगवे फेटे परिधान करून तरुण-तरुणींसह लहान मुलंही सहभागी झाली
होती. याच रॅलीत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा प्रकार घडला
आहे. शहरातून रॅली जात असताना यामध्ये नथुराम गोडसेचा फोटो मिरवण्यात आला.
नाशिक शहरातील रॅलीत ध्वजाचं ठिकठिकाणी औक्षण आणि स्वागत करण्यात आलं. या रॅलीच्या स्वागतासाठी शहरातील रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फुलांचा वर्षावही केला जात होता. पारंपरिक वाद्यांच्या वादनात शहराच्या भद्रकाली पंचवटी आणि जुने नाशिक भागातून ही दौड काढण्यात आली.
विजयादशमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौड रॅलीत नथुराम गोडसेचे फोटो घेऊन मिरवणूक काढली गेली. संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांकडून नाशिक शहरात पुन्हा नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे आता वाद होण्याची शक्यता आहे. रॅलीतील सहभागी तरुणांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भिडे गुरुजी यांचेही फोटो उंचावत जय घोष करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.