Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-वर्षा लड्डा-उंटवाल आष्ट्यातील पहिल्या 'आयएएस' महिला, शहरात आनंदोत्सव

सांगली :-वर्षा लड्डा-उंटवाल आष्ट्यातील पहिल्या 'आयएएस' महिला, शहरात आनंदोत्सव


आष्टा : आष्ट्याच्या सुकन्या वर्षा मुकुंद लड्डा-उंटवाल या शहरातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी ठरल्या. त्यांच्या पदोन्नतीनंतर शहरात जल्लोष करण्यात आला. त्यांच्या यशाने कुटुंबीयांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.

महाराष्ट्र राज्य सेवेतील २३ अधिकाऱ्यांची केंद्र शासनाने सोमवारी आयएएस केडरमध्ये पदोन्नतीने नियुक्ती केली. केंद्र शासनाचे अप्पर सचिव संजय कुमार चौरासिया यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये पुण्याच्या अप्पर आयुक्त वर्षा लड्डा-उंटवाल यांचाही समावेश आहे. आष्टा येथील गणेश नागरी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राम नारायण उंटवाल यांच्या त्या कन्या आहेत.

वर्षा उंटवाल यांनी १९९८ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स येथे, तर पदवी व पदव्युत्तर शिक्षण आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजमधून झाले. बी. कॉम.ला शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. एम. कॉम.ला विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या.

पदवीनंतर प्रा. अनिल फाळके यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्या स्पर्धा परीक्षेकडे वळल्या. १९९८ मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. सर्वप्रथम सिंधुदुर्ग येथे त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर दहिवडी (ता. माण) येथे दुष्काळ निवारणकामी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सांगली, रायगड, पुणे जिल्ह्यांत तसेच पुणे व कोकण विभागीय आयुक्त कार्यालयांत मागासवर्ग कक्षामध्ये तसेच बार्टी येथेही काम केले.

वर्षा उंटवाल व वैशाली उंटवाल या माझ्या दोन्ही मुलींनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळविले. वर्षाची आयएएसपदी झालेली निवड स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे. - आर. आर. उंटवाल, वर्षा उंटवाल यांचे वडील

आई-वडील यांनी दिलेले शिक्षण, संस्कार, स्वातंत्र्य आणि मोलाचा आधार तसेच बहीण वैशालीची प्रत्येकवेळची वाट दाखवण्याची पद्धती, मार्गदर्शन, भाऊ राजेशची परीक्षेवेळची साथ विवाहनंतर पती मुकुंद आणि मुलगा मितुल यांनी दिलेली साथ मोलाची आहे. या सर्वांमुळेच मी हे शिखर गाठू शकले. - वर्षा मुकुंद लड्डा उंटवाल, अप्पर आयुक्त, पुणे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.