Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारचाच दिवस का निवडण्यात आला? हे आहे कारण


विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारचाच दिवस का निवडण्यात आला? हे आहे कारण


अवघ्या देशाचं लक्ष लागलेली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. पुढील महिन्यात २० तारखेला या निवडणुकीचं मतदान होणार आहे. या दिवशी बुधवार आहे.

असा मधला दिवस मतदानासाठी का निवडण्यात आला असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. निवडणूक आयोगानंच याचं उत्तर दिलं आहे.

सर्वसाधारणपणे मतदानाच्या दिवशी त्या-त्या राज्यात सरकारी सुट्टी जाहीर केली जाते. तसंच, खासगी कर्मचाऱ्यांंना मतदानासाठी विशिष्ट तास देण्याचे निर्देश दिले जातात. मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशानं हे केलं जातं. अनेकदा निवडणूक सुट्टीच्या दिवशी घेतली जाते. मात्र, महाराष्ट्र व झारखंड विधानसभेचं मतदान आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (शनिवार किंवा रविवारी) न घेता आठवड्याच्या मधल्या दिवशी ठेवण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील मतदान बुधवारी ठेवण्यात आलं आहे. त्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीच खुलासा केला आहे. हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे. राजकीय पक्षांनीही तशी मागणी केली होती, असं राजीव कुमार म्हणाले.


महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासारख्या शहरी केंद्रांमध्ये मतदानाची टक्केवारी अनेकदा कमी असते. शहरी आणि युवकांच्या उदासीनतेचा मुद्दा आयोगासाठी चिंतेचा विषय असून मतदार जागृती वाढविण्यासाठी आयोग अनेक पावलं उचलत आहे. त्याचाच हा एक भाग आहे. वीकेंडच्या दिवशी किंवा वीकेंडला जोडून मतदान असल्यास शहरी मतदार या सुट्ट्यांचा मेळ घालून दीर्घ सुट्टी घेतात. मतदानाला अनुपस्थित राहतात. हे होऊ नये म्हणून निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतल्याचं राजीव कुमार म्हणाले.

'शहरी उदासीनतेबद्दल आम्हाला खरोखरच चिंता आहे. हा ट्रेंड चांगला नाही. शहरी भागातील सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं, असं आवाहनही राजीव कुमार यांनी केलं. गुडगाव, फरिदाबाद, ज्युबिली हिल्स, हैदराबाद, बेंगळुरू दक्षिण, गांधीनगर, कुलाबा, पुणे, ठाणे... या सगळ्या ठिकाणचं मतदान त्या-त्या राज्यांतील सरासरी मतदानापेक्षा खूपच कमी आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६४ पैकी ६२ शहरी विधानसभा मतदारसंघांत राज्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालं होतं. तोच ट्रेंड लोकसभेतही दिसला. त्यामुळं आता शहरी भागासाठी विशेष मोहीम राबविली जाईल,' असं राजीव कुमार म्हणाले.

मुंबईत कुठं झालं होतं सरासरीपेक्षा कमी मतदान?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही शहरी उदासीनतेचा कल दिसून आला होता. दक्षिण मुंबईतील कुलाबा (४० टक्के), पुणे कॅन्टोन्मेंट (४३ टक्के), मुंबईतील मुंबादेवी आणि कुर्ला (४४ टक्के) आणि मुंबईजवळील कल्याण (४१ टक्के) या भागात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झालं होतं.

नुकत्याच झालेल्या हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत पॉश भागात २० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालं होतं. हे चित्र बदलण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल, असं राजीव कुमार म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.