विधानसभा निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीला मुख्यमंत्री कोण हे जाहीर करता आलेलं नाही. राज्यामध्ये 232 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीच्या दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन दिवसांमध्ये ठरवता आलेलं नाही. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कायम रहावं अशी इच्छा त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी नोंदवलं आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री सूत्रानुसार फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. दोन्ही बाजूने दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समर्थकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
काय म्हणाले शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री 12 वाजून 53 मिनिटांनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीट) अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्या घराबाहेर न जमण्याचं आवाहन केलं आहे. "महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो," असं मुख्यमंत्री शिंदेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.फडणवीसांचा धावता दिल्ली दौरा
तसेच, "माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील," असंही मुख्यमंत्र्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. मात्र "राज्याच्या राजकारणा संदर्भात दिल्लीत आज कोणतीही बैठक नाही," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. फडणवीसांच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सस्पेन्स पुन्हा एकदा वाढला आहे. "लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आलोय आज रात्री माझी कुणाशीही बैठक नाही," असं फडणवीसांनी सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस रात्रीच पुन्हा मुंबईला परतले. आज दिल्लीत महायुतीची बैठक होणार की नाही याबाबत कुठलीही स्पष्टता नाही.
अमित शाह आज मुंबईत?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. शाहांच्या उपस्थितीमध्येच मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.