नवी दिल्ली : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे रविवारी निवृत्त होत आहेत, शुक्रवारी त्यांचा सुप्रीम कोर्टातील कामकाजाचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता त्यांची जागा संजीव खन्ना घेत आहेत. संजीव खन्ना हे सोमवारी देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. पण त्यांच्याबाबत एक विचित्र घटना समोर आली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आपला मॉर्निंग वॉक थांबवला आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, जस्टिस खन्ना हे दररोज सकाळी दिल्लीतील लोधी गार्डन परिसरात मॉर्निंग वॉक करायचे. पण आता ते सरन्यायाधीश होणार असल्याचं निश्चित झाल्यानं त्यांना सरकारनं एकट्यानं मॉर्निंग वॉक करु नये असा सल्ला दिला. मॉर्निंग वॉक करताना त्यांनी प्रोटोकॉलनुसार आपल्या सुरक्षा टीमला सोबत ठेवावं. पण एवढ्या कारणासाठी सुरक्षा रक्षक सोबत घेऊन जाणं त्यांना योग्य वाटत नसल्यानं आपण मॉर्निंग वॉकच बंद करत असल्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी राजधानी दिल्लीतूनच आपलं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं आहे. मॉडर्न स्कूलमधून त्यांनी शालेय तर सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी घेतली आहे. तर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. जस्टिस खन्ना हे अजूनही आपल्या शालेय आणि कॉलेजच्या मित्रांच्या संपर्कात असतात, त्यांना भेटतात.
त्यांच्या मित्रांचंही हे म्हणणं आहे की जस्टिस खन्ना हे पहिल्यापासून आहेत तसेच आहेत, त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठलाही बदल झालेला नाही. त्यांच्या एका मित्रां तर सांगितलं की, ते खूपच साधे, शांत आणि पब्लिसिटीपासून दूर राहणारे आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.