उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबतचा मेसेज मिळाला होता. यावेळी धमकावणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांनाही याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊ शकतात म्हणून पोलीस सतर्क आहेत.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी २४ वर्षीय तरूणीला अटक केली आहे. फातिमा खान असे माहिती तंत्रज्ञान विषयात बीएससी करत असलेल्या धमकी देणाऱ्या तरूणीचे नाव आहे. ती महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर भागात कुटुंबासह राहते. तिचे वडील लाकूड व्यवसाय करतात. ही तरूणी सुशिक्षित असली तरी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, तपासादरम्यान पोलिसांना कळले की फातिमा खान नावाच्या महिलेने हा संदेश पाठवला होता. त्यानंतर मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उल्हासनगर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत महिलेचा माग काढला आणि तिला पकडले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
धमकी मेसेजमध्ये काय म्हटले होते?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला होता, ज्यामध्ये आदित्यनाथ यांनी १० दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न दिल्यास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे त्यांची हत्या केली जाईल, असा संदेश देण्यात आला होता.
भाजपकडून CM योगी आदित्यनाथ असणार स्टार प्रचारक
वृत्तानुसार, योगी आदित्यनाथ 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर मुंबई पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.दरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.