विधानसभा निवडणुकांचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले येऊनही राज्यात महायुतीचं सरकार अद्याप स्थापन झालेलं नाही. सुरुवातीला मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेली रस्सीखेच आता इतर खात्यांपर्यंत आलेली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद घेण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. परंतु एकनाथ शिंदेंची त्यासाठी तयारी नाही. शिंदेंचे अत्यंत जवळचे सहकारी उदय सामंत आणि शंभुराज देसाई यांनीही शिंदेंची मनधरणी केली. परंतु त्याचा काही परिणाम झाल्याचं दिसून येत नाही.आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी सरकारमध्ये नवीन पद निर्माण होण्याची शक्यता आहे. समन्वय समितीचं अध्यक्षपद मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती आहे. यासह गृह खात्यावरही शिंदेंची नजर आहेच. मात्र अद्याप भाजपने याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही.
महायुतीची नियोजित बैठक सोडून एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले. तेथे ते दोन दिवस मुक्काम करणार असल्याची माहिती आहे. १ तारखेला पुन्हा महायुतीची बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीला शिंदे उपस्थित राहतात का, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे त्यांच्या मूळगावी जातात तेव्हा तेव्हा काहीतरी मोठा निर्णय घेतात, असं शिरसाट म्हणाले. त्यामुळे शिंदे नेमका कोणता निर्णय घेणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये संयोजक अथवा मेंटर होण्यासाठी इच्छूक असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घेऊन इतर नेत्याच्या खाली काम करण्यापेक्षा सरकारवर नियंत्रण ठेवण्याचं काम करण्यासाठी ते इच्छूक आहेत. दुसरीकडे गृहमंत्री, नगरविकास मंत्री ही पदंही मिळावीत, यासाठी शिवसेना आग्रही आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.