सांगली : ''सांगली विधानसभा निवडणूक मी लढणार आहे. म्हटल्याप्रमाणे शेवटपर्यंत ठामच आहे. आता कुठल्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नाही,'' असा निर्धार सांगली विधानसभेसाठीच्या उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेस भवनाशेजारील वसंतदादा भवन याठिकाणी आज सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी खासदार विशाल पाटील यांचा आपल्याचा पाठिंबा असल्याचेही सांगितले.
श्रीमती पाटील म्हणाल्या, ''महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांनी माझ्याशी पाच दिवसांपूर्वीच संपर्क साधला. मला विधानपरिषदेवर संधी द्यायचा शब्द दिला. मात्र, मला थेट लोकांमधून लढायचे आहे, असे त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले आहे. त्यामुळे ते आता समजूत काढायला देखील येणार नाहीत.''
यावेळी श्रीमती पाटील म्हणाल्या, ''काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनीच पक्षाचे तिकीट नाकारून आमच्यासोबत यावे. त्यांनी विधानपरिषदेची आमदारकी घ्यावी. भाजपचे बंडखोर उमेदवार अपक्ष शिवाजी डोंगरे यांनीही संपर्क साधला आहे. त्यांनाही सोबत येण्याची विनंती केली आहे. आम्ही पुरोगामी विचारांचे आहोत. आमचा शत्रू भाजप आहे. भाजपचा पराभव हाच आमचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल. त्यासोबतच वारणा उद्भव योजना, महिलांचे विषय घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात महिलांना संधी मिळाली पाहिजे.''
या वेळी माजी महापौर किशोर शहा म्हणाले, ''जयश्रीवहिनी पाटील आणि जयश्रीताई पाटील अशा दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील एक जयश्री पाटील या पृथ्वीराज पाटील यांच्या नातलग आहेत. त्यातून हे कारस्थान स्पष्ट होते.'' पत्रकार परिषदेस स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, उत्तम साखळकर, प्रकाश मुळके, शीतल लोंढे, रवी खराडे, उदय पाटील यांची पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
'आम्हाला एकदाच संधी'
जयश्री पाटील म्हणाल्या, ''मागील विधानभा निवडणुकीवेळी आम्ही थांबलो हीच आमची चूक झाली. आता माघार नाही. आमचे घर सांगलीसाठी झटत आहे. एवढ्या वर्षात आमच्या घराला एकदाच आमदारकी मिळाली; तीही अपक्ष म्हणून.''
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.