पुणे :- हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असताना त्याला चांगली टीप मिळत असे. परंतु, नवा वेटर आल्याने टीपचे पैसे कमी मिळत असल्याच्या रागातून त्याने हॉटेल बाहेर ठेवलेली कुंडी डोक्यात घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले.
याबाबत राकेश प्रकाश लोखंडे (वय ३४, रा. सदगुरु दर्शन, आंबेगाव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मण थापा (वय २२, रा. दबडे चाळ, विश्वराज हॉस्पिटलजवळ, लोणी काळभोर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नर्हे येथील हॉटेल झणझणीत येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही हॉटेल झणझणीत येथे काम करतात. फिर्यादी हे हॉटेलमध्ये काम करत असताना लक्ष्मण थापा या वेटरला वाटू लागले की, राकेश लोखंडे याच्या मुळे त्याला मिळत असलेल्या टिपचे पैसे कमी मिळत आहेत. या रागातून त्याने राकेश यांना तू येथे काम करु नको, तू येथून निघून जा, नाहीतर तुला बघून घेईल, अशी धमकी दिली. त्यांना शिवीगाळ केली. हॉटेलच्या बाहेर ठेवलेली कुंडी राकेश यांच्या डोक्यात मारुन व तोंडावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. पोलीस हवालदार मोरे अधिक तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.