कऱ्हाड : डॉक्टर असल्याची बतावणी करीत विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला डॉक्टरने याबाबतची फिर्याद दिली आहे. समीर ऊर्फ रिजवान ताजुद्दीन शेख (रा. आचार गल्ली, मुंब्रा, मुंबई) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची रिजवान शेख याच्याशी ओळख झाली. त्या वेळी रिजवान शेख याने आपण विवाहेच्छुक असून, मुलगी शोधत असल्याचे सांगितले, तसेच डॉक्टर असल्याचेही त्याने पीडित महिलेला सांगितले होते. जळगाव येथील एका रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असून, मला ८० हजार रुपये प्रतिमहिना पगार असल्याचेही त्याने सांगितले. पीडित महिलेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, तसेच त्याच्याशी विवाह करण्यास होकार दिला.
त्यानंतर १५ जुलै २०२४ ला रिजवान शेख हा कऱ्हाडमध्ये आला. त्याने पीडित महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार त्याने वेगवेगळी कारणे सांगून महिलेला भेटण्यास बोलावले, तसेच त्या-त्या वेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. चार ऑक्टोबरला पीडित महिला रिजवानसोबतच्या विवाहाची तयारी करीत असताना तिला तिच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला.
समोरून बोलणाऱ्या महिलेने ती रिजवान शेख याची पत्नी असून, रिजवान याचे खरे नाव समीर शेख असल्याचे व तो डॉक्टर नसून केमिकल इंजिनिअर असल्याचे सांगितले. पुण्यातील पाषाण येथे त्याने कॅन्टीन चालवण्यासाठी घेतल्याची माहितीही त्या महिलेने दिली. त्यामुळे समीर शेख ऊर्फ रिजवान शेख याने विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे तसेच पहिले लग्न लपवून खोटा बायोडाटा तयार करीत डॉक्टर असल्याचे भासवून आपली फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीडित महिलेने याबाबतची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.