राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पायऊतार व्हायला लावेपर्यंत आणि पक्षाला सत्तेतून बाहेर करेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ तामिळनाडुचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी घेतली.
राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्यावर गंभीर असे आरोपही त्यांनी केले. गुरुवारी कोइंबतूरमध्ये एका पत्रकार परिषदेत हातात बूट दाखवत त्यांनी सर्वांसमोर राज्यातली डीएमकेची सत्ता उलथवून टाकत नाही तोवर चप्पल घालणार नाही असं सांगितलं. अन्ना युनिवर्सिटीत विद्यार्थीनींच्या लैंगिक छळ प्रकरणी सरकारच्या भूमिकेविरोधात आंदोलनाचाही त्यांनी इशारा दिला.
अन्नामलाई यांनी सांगितलं की, मी माझ्या घरासमोर आंदोलन करणार. स्वत:ला 6 वेळा आसुडाचे फटके मारून घेईन. उद्यापासून ४८ दिवसापर्यंत उपवास करेन आणि सहा हातांच्या मुरुगनला आवाहन करेन. उद्या भाजपचे प्रत्येक सदस्य घरासमोर आंदोलन करतील. जोपर्यंत डीएमके सत्तेतून बाहेर होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. आता हे संपायलाच हवं.
तामिळनाडुतील विरोधी पक्ष एआयडीएमकेने अन्ना युनिवर्सिटीच्या एका विद्यार्थीनीच्या लैंगिक छळ प्रकरणी आंदोलनाचा प्रयत्न केला. डीएमके सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. एआयडीएमकेच्या या आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या एआयडीएमकेच्या वरिष्ठ नेत्यांना ताब्यात घेतलं आहे.भाजपचे वरिष्ठ नेता आणि माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही पोलिसांनी आंदोलन करण्यापासून रोखलं. सुंदरराजन यांनी म्हटलं की, आम्हाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लैंगिक गुन्हे वाढत आहेत आणि पोलीस निष्क्रीय झाले असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.एआयडीएमकेचे नेते डी जयकुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वादावादी झाल्याचंही सांगितलं. ते म्हणाले की, आम्हाला आंदोलनाची परवानगी दिली नाही. पोलीस अधिकाऱ्यांकडून याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला की, सत्ताधारी पक्षाचे सहकारी काँग्रेस, व्हीएसकेसह इतर पक्षांना कशा प्रकारे परवानगी दिली गेली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.