महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. याची परतफेड म्हणून मनसेला सत्तेत सहभागी करून घेण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
राज ठाकरे यांनी याबाबत आपला निर्णय जाहीर केला नसल्याने सत्ता सहभागाबाबत अनिश्चितता कायम आहे. राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे मनसेच्या नेत्यांचेही लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंब्याची भूमिका घेत काही उमेदवार उभे केले होते. काही जागांवर भाजपने मनसेला पाठिंबादेखील दिला होता. भाजप आणि मनसेची ही निवडणूक रणनीती होती, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्व
आणि मराठी मुद्द्याकडे आपले लक्ष पुन्हा केंद्रित केले आहे. त्यांची ही
भूमिका भाजपसाठी पूरक आणि ठाकरेंच्या शिवसनेला अडचणीची ठरणारी असल्याचे
सांगितले जाते.
अधिकृत प्रस्ताव नाही!
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर ही भूमिका जाहीर केली असली तरी अधिकृत प्रस्ताव मनसेला मिळालेला नसल्याचे मनसे नेते शिरीष सावंत यांनी सांगितले. याबाबतचा सर्वतोपरी निर्णय स्वत: राज ठाकरे घेतील. याबाबत अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नसल्याचेही सावंत यांनी सांगितले. सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, सहभागी झालो तर कुठली मंत्रिपदे घ्यायची, यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.