कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरातील विजयनगर येथे करण्याची मागणी जनसुराज्य युवाशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी १७ तारखेला होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या बैठकीत कुलगुरूं सोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. या भेटीत जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यामध्ये सांगली जिल्ह्यातील नियोजित कवलापूर एअरपोर्ट यासह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान तातडीने हे विषय मार्गी लावण्याचे आश्वासन राज्यपालांनी समित कदम यांना दिले.
अनेक वर्षापासून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाच्या आधीसभेत मंजुरी मिळूनही सांगलीतील उपकेंद्र रखडले आहे. या उपकेंद्राचा फायदा सांगली, मिरज, कवठेमंकाळ, जत, कडेगाव, पलूस, तासगाव, आटपाडी या तालुक्यांना होणार असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा प्रवास आणि वेळ वाचणार आहे. तसेच सांगलीत विजयनगर येथे प्रशासकीय इमारतीच्या मागे शासकीय जागा असून या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र झाल्यास जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांना ते सोयीचे होणार आहे. यामुळे शिवाजी विद्यापीठाचे सांगलीत उपकेंद्र गरजेचे आहे. शिवाय महाविद्यालयासंदर्भात छोटेसे काम असल्यास विद्यार्थ्यांना कोल्हापूरला जाऊन हेलपाटे मारावे लागतात. यामध्ये त्यांचा वेळ आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यासाठी अनेक वर्षापासून विद्यार्थी आणि महाविद्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र कधी खानापूर तर कधी तासगाव आणि आटपाडी या ठिकाणी उपकेंद्र होणार अशा चर्चाच होत आहेत.
असे अनेक पर्याय देऊन यामध्ये खानापूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्रास मंजुरी मिळाले असल्याचे वारंवार सांगितले जाते मात्र चालू स्थितीला कोणतेही कारवाई उपकेंद्र संदर्भात होत नसल्यामुळे यामध्ये त्वरित लक्ष घालून सांगली जिल्ह्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याची मागणी जनस्वराज्य युवाशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे. दरम्यान 17 जानेवारी रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या बैठकीमध्ये प्राधान्य क्रमाने कुलगुरूंशी चर्चा करून उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही राज्यपालांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.