सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. रुबेल सिन्हा मृत तरुणीचं नाव आहे.रुबेल पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होती.
तीन तरुण आणि एक तरुणी महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळील नीरा नदी पुलावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रुबेल रस्त्यावर पडली आणि तिच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी धाव पोहोचले. त्यांनी महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रुबेल हिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिरवळ पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, ट्रक चालकाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामुळे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता पुन्हा एकदा समोर आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.