मांत्रिकाने स्मशानात मांडली पूजा! अर्धवट जळालेली बोकडाची मान अन् तरुणींचे फोटो, धुळ्यात हादरवून टाकणारा प्रकार
धुळ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अघोरी बाबाने मध्यरात्री स्मशानात पूजा मांडली. शेकडो लिंबे त्यात लिंबांमध्ये सुया टोचलेल्या, दोन कोंबड्या आणि धडावेगळं केलेलं बोकड; अशी पूजा सुरु होती. परंतु स्मशानाजवळच्या शेतकऱ्याला शंका
आल्याने सर्वांनीच तेथून पळ काढला. विशेष म्हणजे या पूजेमध्ये काही
तरुणींचे फोटो आढळून आले आहेत. महा अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट
दिली.
महा. अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आणि अनेक गोष्टींची उकल केली असली तरी लोकांचा तंत्र-मंत्र, काळी नजर, काळी जादू आणि अघोरी कर्मकांड यावरील विश्वास काडीमात्र कमी झालेला नाही. असाच अघोरी पुजेचा खेळ धुळे जिल्ह्यातील मोहाडी (प्र. डांगरी) येथील स्मशानात शुक्रवारी (२४ जानेवारी) मध्यरात्री सुरू होता. या अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाचे सारे सुरळीत चालले असताना एका शेतकऱ्याने त्याला हटकल्याने त्याने स्मशानातून पळ काढला. 'त्या' शेतकऱ्याने अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाची पूजा जवळून पाहिली तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच घसरली. त्यास चांगलाच धाम फुटला, त्याचे पाय लटपटू लागले होते.
नेमकी पूजा काय?
अविनाश पाटील पुढे सांगतात, अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाने एका बोकडाची मान धडावेगळी केलेली होती. दोन जीवंत कोंबड्यांचे पाय दोरीने बांधलेले होते. सरण जेथे रचतात त्या ओट्यावर २०० ते २५० लिंबू, कवड्यांचा खच पडलेला होता. या लिंबूवर हळद, कुंकू, काळा बुक्का, अत्तर शिंपडण्यात आले होते. बोकडाची मान अधर्वट जळालेल्या स्थितीत होती. तर लिंबूंवर सुया टोचून त्यात तरूणींचे फोटो लावण्यात आले होते. स्मशानभूमीत जाऊन सदर ठिकाणची पाहणी ग्रामस्थ, पोलीस पाटील, सरपंच यांच्यासह महा. अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, रणजित शिंदे, प्रा. डॉ. दीपक बाविस्कर, नंदकिशोर सूर्यवंशी यांनी केली.
फेसबुक पोस्टमध्ये अविनाश पाटील पुढे सांगतात,
स्मशानभूमीतील भयाण शांतता अंगाचा थरकाप उडवते. रात्री तेथे भूतांचा संचार असतो, असा (गैर) समज जनमाणसात असल्याने रात्रीला स्मशनात कोणीही पाय ठेवत नाही. मात्र, अमावस्या अन् पौर्णिमेला अघोरी कृत्य करणाऱ्या बाबांची पाऊले स्मशानभूमीच्या दिशेने आपोआप वळतात. विद्या हासील करण्यासाठी अथवा घेतलेली सुपारी पूर्ण करण्यासाठी हे मांत्रिक स्मशानातच 'अघोरी' पूजा मांडतात. मोहाडी (प्र. डांगरी) येथील स्मशानभूमीत साधारणतः मध्यरात्री २.२० वाजता बाबा आणि त्याच्यासोबत काही जण चारचाकी वाहनातून स्मशानात आले. त्यांनी सोबत एक बोकड, दोन जीवंत कोंबडे आणि पुजेचे साहित्य आणले होते. मुक्या प्राण्यांचा बळी देण्याच्या ते इराद्याने आले होते. यापैकी बोकड्याची मान एकाच झटक्यात धडावेगळी करण्यात आली होती. यासाठी बहुधा तलवारीचा वापर झाला असेल; इतक्या सराईतपणे ती मान छाटण्यात आली होती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बोकडानंतर कोंबड्यांचा बळी जाणे निश्चित होते. बाबाने पुजेसाठी अग्नीडाग देण्यासाठी वापरण्यात येणारा ओटा निवडला होता. या ओट्यावरच लिंबूंचा खच, तरूणींचे फोटो, बोकडाची मान आणि इतर पूजासाहित्य मांडण्यात आले होते. तसेच अवतीभोवती रांगोळी काढण्यात आली होती. संबंधित अघोरी बाबाची पूजा ऐन भरात आलेली असताना नजिक शेत असलेल्या शेतकऱ्याला जाग आली. त्याला स्मशानात सरण जळताना दिसले. तेथे काही लोकांच्या हालचाली संशयास्पदपणे दिसल्याने त्याने तिकडे टॉर्च चमकावली. आपल्याला कोणीतरी बघतयं ही चाहूल लागताच अघोरी बाबा आणि त्याच्या सोबतचे सहकारी दचकले.आपण लोकांच्या तावडीत सापडलो तर मार बसेल हे ओळखून त्यांनी स्मशानातून धूम ठोकली. दरम्यान, या घटनेची वार्ता गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सकाळी तिकडे धाव घेतली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अघोरी बाबाला कोणाचा तरी जीव घ्यायचा असेल किंवा त्यांना मुलींना वश करून द्यायचे असेल अशी चर्चा तेथे रंगली होती. तसेच स्मशानात आढळलेले फोटो है बिहारी समाजातील असल्याची कुजबूजही ग्रामस्थांमध्ये आहे. अशी माहिती महा. अंनिसचे अविनाश पाटील यांनी दिली आहे. त्यांनी रविवारी सायंकाळी याबाबत फेसबुक पोस्ट केली. स्मशानातील पूजेचा फोटोही शेअर केला. तरुण मुलींना वश करण्यासाठी हा उपद्व्याप केल्याची शंका आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासन काय कारवाई करतं, हे पाहावं लागेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.