सांगली :-तपासणीत दोषी आढळ्याने जिल्ह्यातील खते- औषधांच्या आठ दुकानांचे परवाने निलंबित; तीन कंपन्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
सांगली : रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १४७० खत व औषध विक्री दुकानांची जिल्हा कृषी विभागातर्फे तपासणी करण्यात आली होती. त्यांतील २९ दुकानांमध्ये त्रुटी आढळल्या असून, त्यांतील आठ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. खत व औषध निर्मात्या ५० कंपन्यांच्या तपासणीत तीन कंपन्यांत गंभीर दोष आढळले असून, त्यांच्या परवाना निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार उपस्थित होते. रब्बी हंगामात खत आणि औषधांचा तुटवडा निर्माण केला जातो. काही खतांमध्ये भेसळ केली आहे. बनावट खते तयार केली जातात. औषधांमध्ये बनावटगिरी केली जाते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने औषध व खत विकणाऱ्या दुकानांची तपासणी मोहीम राबवली होती. त्यांत १४७० दुकानांची तपासणी करण्यात आली.
त्यांतील २९ दुकानांमध्ये साठा व अन्य बाबतीत दोष आढळून आले. गंभीर दोष असणाऱ्या आठ दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला. त्याचवेळी जिल्ह्यातील १०१ पैकी ५० औषध व खत निर्मात्या कंपन्यांची तपासणी करण्यात आली. पैकी तीन कंपन्यांमध्ये दोष आढळून आले असून त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. डॉ. दयानिधी म्हणाले, "जिल्ह्यात बी-बियाणे आणि खतांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. शेतकऱ्यांनी त्याची गुणवत्ता आणि वजन तपासून खरेदी करावी. त्याबाबत शंका असतील तर थेट तक्रार करावी."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.