Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारताच्या संविधानाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का? जाणून घ्या, संविधानासंदर्भातली रोचक माहिती

भारताच्या संविधानाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का? जाणून घ्या, संविधानासंदर्भातली रोचक माहिती
 

मुंबई : भारताच्या इतिहासात 15 ऑगस्ट या दिवसाला जितकं महत्त्व आहे तितकच महत्त्व 26 जानेवारीला आहे. 1947 रोजी देश स्वतंत्र्य जरी झाला असला तरीही खऱ्या अर्थाने लोकशाहीची, प्रजासक्ताची पहाट झाली ती 1950 मध्ये.

कारण 26 जानेवारी 1950 मध्ये भारताने आपली राज्यघटना स्वीकारून पूर्ण सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक होण्याच्या दिशेने सर्वात मोठं पाऊल टाकलं. यंदा आपण 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड साजरी होईल. या वर्षीची थीम आहे, 'स्वर्णिम भारत: परंपरा आणि विकास', जी भारताच्या गौरवशाली वारसा आणि उज्वल भविष्याकडची वाटचाल यावर अवलंबून असणार आहे. आपण 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा जरी करत असलो तरीही प्रजासत्ताक दिनासंदर्भात अनेक रोचक आणि मनोरंजक गोष्टी आपल्याला माहिती नाहीत. अशाच काही निवडक रोचक आणि मनोरंजक गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
1934 मध्ये, सर्वप्रथम मानवेंद्र नाथ रॉय यांनी संविधान सभेची कल्पना सुचवली, त्यानंतर 1935 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. सुरूवातीला संविधान हे मुद्रित किंवा टाइप केलेलं नव्हतं. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत काळजीपूर्वक हाताने लिहीलं होतं. हस्तलिखित संविधानाचं प्रत्येक पान नंदलाल बोस आणि बेओहर राममनोहर सिन्हा यांच्यासह शांतिनिकेतनच्या कलाकारांनी कलात्मकरीत्या सजवलं होतं.
आपण नेहमी म्हणतो भारताची लोकशाही, भारताचं संविधान सर्वोत्तम आहे. पण तुम्हाला कल्पना आहे का ? भारताचं संविधान हे खूप दीर्घ आहे. भारताच्या संविधानात तब्बल 1 लाख 17 हजार 369 शब्द असून जगातील सर्वात मोठं संविधान असल्याचा विक्रम भारताच्या नावे आहे. जर तुलनाच करायची असेल तर मोनॅको देशाचं उदाहरण देता येईल. त्यांची राज्यघटना फक्त 3 हजार 814 शब्दांची आहे. यावरून तुम्हाला आपल्या संविधानाच्या श्रेष्ठत्वाची कल्पना येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांना संविधान मसुदा समितीचं अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. संविधानाचा अंतिम मसुदा पूर्ण करण्यासाठी 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लागले होते. संविधानाचा अंतिम मसुदा स्वीकारण्यापूर्वी त्यात 2,000 हून अधिक सुधारणा केल्या होत्या. सुरुवातीला जेव्हा राज्यघटना स्वीकारली गेली तेव्हा त्यात 395 कलमं होती. संविधानाच्या मसुदा आणि प्रकाशनासाठी त्यावेळी 64 लाख रुपयांचा खर्च झाला होता.
1935 च्या भारत सरकारच्या कायद्याची जागा राज्यघटनेने, संविधानाने घेतली, जी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाण्याचं प्रतिक मानलं जातं. राज्यघटनेच्या मूळ प्रती भारतीय संसदेच्या ग्रंथालयात हेलियमने भरलेल्या पेटीत जतन करून ठेवल्या आहेत. जेणेकरून त्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी सुरक्षित राहतील. 2021 पर्यंत, राज्यघटनेत, संविधानात विविध घटनादुरूस्त्या होऊम 470 कलमं, 25 भाग आणि पाच परिशिष्ट आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.