घरात पेस्ट कन्ट्रोल करणं पडलं 30 लाखांना, मुंबईतील संपूर्ण कुटुंब पोहोचलं रुग्णालयात, मुलाची मृत्यूशी झुंज
मुंबई: मुंबईच्या लालबाग परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबासोबत भयावह प्रसंग घडला आहे. संबंधित कुटुंबीयांना घरात पेस्ट कन्ट्रोल करणं चांगलंच महागात पडलं आहे. पेस्ट कन्ट्रोल केल्यानंतर तयार झालेल्या विषारी वायूमुळे कुटुंबातील चारपैकी तिघांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. या दाम्पत्याचा 16 वर्षांचा मुलगा
मागच्या २१ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला आयसीयूमध्ये दाखल
केल्याने रुग्णालयाचं बिल देखील 30 लाख रुपयाहून अधिक झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब मुंबईच्या लालबाग परिसरात वन रुम किचनच्या घरात राहातं. ते अनेकदा घरात पेस्ट कन्ट्रोल करायचे. मागच्या १२ वर्षांपासून एकाच पेस्ट कन्ट्रोल प्रोव्हायडरकडून ते पेस्ट कन्ट्रोल करून घ्यायचे. गेल्या महिन्यातही नेहमी प्रमाणे त्यांनी घरात पेस्ट कन्ट्रोल केलं होतं. पण यावेळी या कुटुंबासोबत भयंकर घडलं आहे.
जास्त वेळ पेस्ट कन्ट्रोल केल्याने संपूर्ण कुटुंब रुग्णालयात पोहोचलं, तर या दाम्पत्याचा 16 वर्षांचा मुलगा सिद्धार्थ मृत्यूच्या दाढेत अडकला आहे. मागच्या 21 दिवसांपासून त्याच्यावर अग्रीपाडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला ECMO लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं आहे. पेस्ट कन्ट्रोलमुळे तयार झालेल्या विषारी वायूमुळे सिद्धार्थचं हृदय आणि फुफ्फुसं डॅमेज झाली आहेत. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यासाठी दर दिवसाला ७५ हजार ते ९० हजार रुपये इतका खर्च येत आहे. आतापर्यंत या कुटुंबीयांनी ३० लाखांहून अधिकची रक्कम रुग्णालयात भरली आहे.या कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत. जेव्हा पेस्ट कन्ट्रोल करण्यात आलं तेव्हा चारपैकी तिघांना विषारी वायूचा त्रास झाला. मुलाच्या आईवर एक रात्र उपचार करून सोडण्यात आलं. तर वडिलांना चार दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. मात्र मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर मागच्या २१ दिवसांपासून उपचार सुरू आहेत. घरात केलेल्या पेस्ट कन्ट्रोलमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं असून उपचारासाठी लाखोंचा खर्च झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.