गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा मूड सातत्यानं बदलत आहे. राजकारणात काहीच अशक्य नाही असं म्हटलं जायचं. पण आता या उक्तीचा प्रत्येय अलीकडच्या वर्षांत अख्ख्या महाराष्ट्राला येऊ लागलाय.
शिवसेना फुटली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुट पडली. सध्याच्या स्थितीत कोण कोणत्या पक्षाचा नेता आहे हेच कळायला मार्ग नाही. मागील काळापासून असे एक ना अनेक राजकीय भूकंप राज्याच्या जनतेनं अनुभवले आहेत. आता आगामी काळात राजकारणात आणखी ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या दाव्यानं तर पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनाच फुटणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केला आहे. येत्या काही दिवसांत शिंदेंची सेना भाजपत विलीन होईल, असा दावा राऊतांनी केला आहे. शिंदे सेनेचा एक गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाईल, असंही राऊत म्हणाले. भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांचे काम झाले आहे. आता त्यांचं स्वतःचंच काम तमाम होणार आहे. त्यांना आणि त्यांच्या लोकांनाही हे माहीत आहे. त्यांचा पक्ष भाजपत विलीन होईल किंवा एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपत जाईल. हे स्टॅम्पपेपरवर लिहून सही करून देतो, असं राऊत ठामपणे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.