साईबाबांच्या दर्शनाला जाताय ? शिर्डीत चालू आहे हा स्कॅम; श्रीमंत महिला दिसल्या कि.
शिर्डी: शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर, विविध फसवणुकीच्या घटना उघड होत असताना, शिर्डीतील महागड्या साडी विक्रीतून साईभक्त भाविकांची आर्थिक लूट थांबवावी, अशी ठाम भूमिका शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी व्यक्त केली. शिर्डीत भाडोत्री जागांमध्ये भव्य साडी शोरूम्स मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या ठिकाणी साईभक्त भाविकांना आकर्षित करून, चालकांना ५०% कमिशन आणि सेल्समनला देखील मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते, असा आरोप कोते यांनी केला.
या व्यवसायावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आपण ठोक भूमिका घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. शिर्डीतील महागड्या साडी विक्रीचा फंडा जोमाने विस्तारला आहे. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर, श्रीमंत महिला भाविक 'शिर्डीची आठवण' म्हणून महागड्या साड्यांची खरेदी करतात. हे ओळखून, काही चालक जाणूनबुजून अशा शोरूममध्ये भाविकांना घेऊन जातात.
या आकर्षक आणि भारदस्त शोरूममध्ये, महिला भाविकांचा आर्थिक स्तर आणि त्यांची आलिशान वाहने पाहून, हुशार सेल्समन अत्यंत महागड्या साड्या विक्रीसाठी पटवतात. हा प्रकार साईभक्तांचे सरळसरळ आर्थिक शोषण असून, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कोते यांनी केली. शिवसेनेचे नेते कमलाकर कोते हे नेहमीच साईभक्त भाविकांच्या शोषणाविरोधात लढत आले आहेत.
या फसवणुकीला आळा बसावा, यासाठी प्रशासनाने देखील योग्य ती दखल घ्यावी, अन्यथा वेळप्रसंगी अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी आपल्या भाषणात दिला. शिर्डीतील हा आर्थिक शोषणाचा प्रकार त्वरित थांबवावा, अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी ठाम भूमिका त्यांनी रोखठोक ग्रामसभेत मांडली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.