प्रियकराच्या मदतीने पतीचा दगडाने ठेचून खून
अंकली: अनैतिक संबंधाला अडचण ठरल्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात दगडाने घाव घालून खून करून मृतदेह कृष्णा नदीत फेकल्याची घटना गुरुवारी सकाळी बुवाची सौंदती येथे उघडकीस आली. आप्पासाहेब ऊर्फ तुकाराम ओलेकर (वय 40, रा. सध्या बस्तवाड, ता. रायबाग) असे खून झालेल्याचे नाव आहे. बस्तवाड येथील गणपती कांबळे याच्याबरोबर सिद्धवा ओलेकर हिचे अनैतिक संबंध होते. यामध्ये अडचण ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याच्या उद्देशाने तिने पतीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर प्रियकराच्या मदतीने बुधवारी रात्री बुवाची सौंदत्ती येथे कृष्णा नदीपात्रात मृतदेह फेकून दिला होता.
गुरुवारी सकाळी मृतदेह कृष्णा नदीच्या काठावरील निदर्शनास येताच ग्रामस्थांनी रायबाग पोलिस ठाण्यास माहिती दिली. रायबाग पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास केल्यावर अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्याने सिद्धवाने पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले. सिद्धवा हिने तशी कबुली दिल्यामुळे दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मृताची बहीण महानंदा तोरणवर यांनी रायबाग पोलिस ठाण्यात सिद्धवा ओलेकर हिने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची फिर्याद दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.