खेड: सुनावणी पुढे ढकलली म्हणून खेड तहसील कार्यालयात झालेल्या कथित तू तू.. मैं मैं प्रकरणात संबंधित वकिलांकडून अरेरावी आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर दिलगिरी व्यक्त झाल्याचा खुलासा त्यांनी निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांच्या उपस्थितीत केला.
तहसील कार्यालयात शुक्रवारी (दि. 31) वकिलांच्या आंदोलनाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खुलासा करताना तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही माहिती दिली. देवरे म्हणाल्या, मी रजेवर होते. वकील महोदयांना या वेळी थांबावे लागले. संबंधित वकील जोगदंड यांच्या केबिनमध्ये गेले. तेथे त्यांच्यात बाचाबाची झाली. संबंधित वकिलांनी जोगदंड यांना शिवी दिली. त्यानंतर वादविवाद वाढला.
तेथून जोगदंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. त्या वेळी खेड वकील बार असोशिएशनचे अध्यक्ष रोहिदास टाकळकर यांनी नायब तहसीलदारांना मोबाईलवरून गुन्हा दाखल करू नका. झालेल्या प्रकराबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर नायब तहसीलदारांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यांनी गुन्हा दाखल केला नाही.पोलिस बोलावले म्हणून वकिलांचा अवमान झाला असे वकिलांनी म्हटले. मात्र, एका न्याय दंडाधिकारी अधिकार्यापुढे जाऊन शिवीगाळ करण्याबाबत त्यांना कळले पाहिजे. शिवीगाळ करून जे वर्तन केले आहे ते चुकीचे नाही का ? चुकीची माहिती देऊन मोर्चे काढणे चुकीचे आहे. जोगदंड म्हणाले, त्या दिवशी सकाळी सुनावणी होती. तहसीलदार बाहेर होत्या त्यामुळे पुढील तारखा दिल्या. सुनावणी पुढे ढकलल्याबाबत संबंधित वकिलाने जाब विचारत मोठ्याने अवार्च्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेलो होतो. मात्र, पोलिसांच्या मोबाईलवर संघटनेच्या अध्यक्षांचा फोन आला. त्यामुळे तक्रार दिली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.