Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सासू- सुनेचा वाद विकोपाला, न्यायालय प्रवेशद्वारावरच 'फ्री स्टाईल' हाणामारी

सासू- सुनेचा वाद विकोपाला, न्यायालय प्रवेशद्वारावरच 'फ्री स्टाईल' हाणामारी



नाशिक : सासू, सुनेच्या नात्यात वाद होणे सामान्य बाब असल्याचे सुज्ञ सांगतात. मात्र, सामान्य वाटणारा हा वाद किती विकोपाला जाऊ शकतो, याची प्रचिती देणारी घटना चक्क न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच घडली. तारखेनिमित्त आमनेसामने आलेल्या सासू-सुनेमध्ये अशी काही तुफान हाणामारी झाली की, त्यांना आपण वाद कुठे घालतो याचेदेखील भान उरले नाही. अखेर पोलिसांनाच या वादात उडी घेत, दोघींवर कारवाई करावी लागली.

 
सासू आणि सुनेमध्ये अजिबातच पटत नसल्याने, प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. दुसऱ्या तारखेसाठी जेव्हा सासू आणि सुन न्यायालयात आले, तेव्हा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्यात बाचाबाची झाली. सासू यमूना यशवंत निकम (५८, पिंपळपट्टी, मोरे मळा, जेलरोड) आणि सुनेचा भाऊ दीपक हिरामण साळवे (३७, रा. धुळगाव, त्र्यंबकरोड, महिरावणी) यांच्यात शाब्दीक चकमक झाली. बघता बघता, वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन्ही गटाकडून महिला आणि पुरुष भिडले. उपस्थितांनी यावेळी मध्यस्थी करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गट इतके आक्रमक होते की, मध्यस्थी करणाऱ्यांना देखील ते जुमानत नसल्याचे दिसून आले. अखेर सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत, दोन्ही गटांना पोलिस ठाण्यात हजर केले. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संबंधितांना मेडिकल मेमो देण्यात आले. दरम्यान, न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच अशाप्रकारे फ्री स्टाईल हाणामारीचा प्रकार घडल्याने, न्यायालय आवारात दिवसभर एकच चर्चा रंगली होती. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.