गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काहीना काहीना कारणासाठी गाठीभेटी होत आहेत. पक्ष फुटीनंतर अजित पवार गटाचे सर्वच नेते दिल्लीत शरद पवार यांच्या भेटीला पोहचले होते. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि अजित
पवार एकाच कार्यक्रमात होते. यानंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र
यायला हवं तर ते लवकरच एकत्र येतील अशा चर्चा दबक्या आवाजत सुरू आहेत. पण
या फक्त चर्चाच आहेत की यात काही तथ्य यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष
खासदार सुनील तटकरे यांनी एका वाक्यात उत्तर देत या चर्चांना पूर्णविराम
लावला आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं जेणेकरून राष्ट्रवादी एक होईल अशी इच्छा अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी बोलून दाखवली होती. पण ती काही अद्याप पूर्ण झालेली नाही आणि भविष्यात कधी होईल असे याचे काही सांगता येत नाही. यावरून खासदार तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे यांनी, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने राज्यात मोठे यश संपादन केले आहे. राज्यातील जनतेने आमच्यावर शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही. आमचा महायुतीत राहण्याचा निर्णय पक्का असून आम्ही आमच्या मताशी ठाम आहोत. जे आमच्या मताशी सहमत असतील ते सोबत येतील, असे म्हटले आहे.
तसेच तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदार कदम यांनी केलेल्या आरोपांवर देखील उत्तर दिले आहे. कदम यांनी, विधानसभेवेळी तटकरे यांच्या लोकांनी योगेश कदम यांचे काम केले नाही, असा दावा केला आहे. तर याबाबत आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. यावरून तटकरे यांनी, रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ते माझे चांगले मित्रही आहेत. पण खेड, दापोली हा भाग माझ्या लोकसभा मतदारसंघात येतो. त्यांनी, विधानसभेला माझ्या कार्यकर्त्यांनी योगेश कदम यांच्याविरोधात काम केल्याचा आरोप केला आहे. तसे पत्र मला पाठवतो असेही म्हटलं आहे. पण ते पत्र आल्यावरच मला बोलता येणार आहे. त्या पत्रावर मी अभ्यास करेन आणि त्यांच्यासोबत चर्चाही करेन असे तटकरे यांनी म्हटले आहे.
पालकमंत्रीपदाचा वाद लवकरच मिटेल
रायगडमध्ये पालकमंत्रीपदाबाबत सुरू असलेला वाद देखील लवकरच मिटेल, असेही तटकरे यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे देखील खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.