शरद पवारांच्या अतिशय विश्वासू सहकाऱ्याचं निधन; ४२ वर्ष सावलीसारखी दिली साथ
मुंबई: १९७२ पासून शरद पवारांसोबत सावलीसारख्या राहणाऱ्या स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचं निधन झालं आहे. शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक सहकाऱ्यांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनानं कुटुंबातीलच एक व्यक्ती गेल्याचं दुःख होतंय अशी भावनिक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. तुकाराम धुवाळी यांच्या निधनाचं वृत्त समजताच शरद पवारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शरद पवारांनी फेसबुक पोस्ट लिहून म्हटलं की, मी १९७२ पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी आणि ही जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहून सांभाळली. अतिशय विश्वासू, प्रामाणिक व सचोटीने वागणारा, नीगर्वी तसेच सतत हसतमुख असणारा, प्रत्येक व्यक्तीशी आदरानं वागणारा, प्रत्येकाचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा निराळ्या सहकाऱ्याचं देहावसान झालं याचं मला अत्यंतिक दुःख होतंय असं त्यांनी सांगितले.तसेच आपल्या कामाचा व्याप जसा वाढत जातो तेव्हा अशी काही माणसं जवळ असावी लागतात की ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चिंतपणे वेगवेगळ्या प्रकारची कामं करु शकतो. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चिंतपणे, प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यात आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही. अशातीलच तुकाराम धुवाळी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचं दुःख होतंय असं भावूक उद्गार शरद पवारांनी त्यांच्या आठवणीत काढले.
४२ वर्ष शरद पवारांना दिली साथ
वयाच्या २७ व्या वर्षी शरद पवार पहिल्यांदा आमदार बनून विधानसभेत पोहचले होते. मागील ५० वर्षाच्या कारकिर्दीत शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद, देशाचं संरक्षणमंत्री, कृषीमंत्री यासारखी मोठमोठी पदे भूषवली. या काळात शरद पवारांच्या सोबत स्वीय सहाय्यक म्हणून राहिलेल्या तुकाराम धुवाळी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून काम केले. मात्र मंगळवारी तुकाराम धुवाळी यांचं दीर्घ आजाराने निधन झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.