कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयातून गेल्या पाच वर्षांत दिलेल्या दिव्यांग दाखल्यांची चौकशी होणार आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याप्रकरणाची चौकशी करताना अनेक धक्कादायक बाबींची माहिती पुढे येत आहे.
त्याची खात्री करण्यासाठी ही समिती नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे यांनी दिली. नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करणाऱ्यांना पोलिसांनी गजाआड केले. आता दिव्यांगाचा बनावट दाखला देणारे कधी गजाआड जाणार, याची प्रतीक्षा आहे. दिव्यांगांचा बनावट दाखल्याचा वापर करून एमपीएससीमध्ये निवड झाल्याची बातमी 'सकाळ'ने सर्वप्रथम प्रसिद्ध केली. राज्यातील नऊ, तर जिल्ह्यातील तिघांचे दाखले संशयास्पद असल्याचे एमपीएससीने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केले.
पडताळणी करण्याचे काम शासनाच्या परिपत्रकानुसार मुंबईतील जे. जे. रुग्णालयात करण्यात येते. त्यामुळे या तिघांची पडताळणी मुंबईत करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले. बनावट दाखले रद्द केले. विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यमान अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांच्याच बनावट सहीने हा दाखला दिल्याची माहिती पुढे आली आहे. अशीच स्थिती अन्य अधिकाऱ्यांबाबत घडल्याचे दिसून आले. त्यानुसार डॉ. मोरे यांनी दिव्यांगाचे बनावट दाखले देण्याचे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी डॉ. शिशीर मिरगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बनावट दाखल्याची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. मात्र, जुलै २०२४ चा समितीचा अहवाल अद्यापही तयार झालेला नाही. यामुळे बनावट दाखले देणारे अद्याप मोकाट आहेत.
बनावट दाखले दिले कोणी?
दिव्यांगांच्या बनावट दाखल्यांसंदर्भात 'सकाळ' मध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर चौकशी समिती नियुक्त केली. एमपीएससीच्या ज्या चौघांबाबत मुद्दा होता, त्यांची पडताळणी जे. जे. रुग्णालयात होणार असल्यामुळे तो निकाली निघाला. तरीही बनावट दाखले दिले कोणी, हे तपासणी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने गेल्या सहा महिन्यांत त्याचा अहवाल अद्याप दिलेला नसल्याचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी सांगितले.'२०१९ पूर्वी डॉक्टर दिव्यांगाचे दाखले तपासून देत होते. त्यानंतर वेगवेगळ्या तांत्रिक पद्धती शासनाने आणल्या. सध्या तांत्रिक पद्धतीमुळे दाखले देताना कोठेही चूक राहत नाही. मात्र, पूर्वी दिलेल्या दाखल्यांबाबत संशय व्यक्त होत आहे. मी एक वर्षापूर्वी येथे रुजू झालो आहे. तत्पूर्वी येथे काही उमेदवार, लिपिक यांच्याकडूनही चूकभूल झाली असेल. यंत्रणा हॅकही होऊ शकते. डॉक्टरांचे अहवाल अन्यत्र तयार होत असल्याचा संशय समितीकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे २०१९ पासून दिलेल्या सर्व दिव्यांगांच्या दाखल्यांची चौकशी आणि पडताळणी करावी लागणार आहे.- डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.