Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १५ व्या मिनिटाला कॉल, २ कोटींची मागणी

बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १५ व्या मिनिटाला कॉल, २ कोटींची 
 

छत्रपती संभाजीनगर : दाेन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा ७ वर्षीय मुलगा चैतन्य याचे कारमधून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी घटनेच्या १५ मिनिटांतच सुनील यांच्याशी संपर्क साधून खंडणीची मागणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. मंगळवारी रात्री ०८.४५ वाजता एन-४ मध्ये ही घटना घडली. तुपे हे बिल्डर असून, त्यांचे भाऊ वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत. सुनील कुटुंबासह एन-४ मधील सेक्टर एफ-१ मध्ये वास्तव्यास असतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतल्यानंतर ते दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते.

चैतन्यचा लहान भाऊ वडिलांसोबत होता. चैतन्य सायकलवरून घरापासून एन-४ च्या रस्त्याच्या दिशेने जात असताना मागून काळ्या रंगाची कार आली. त्याच्या सायकलच्या बाजूलाच अपहरणकर्त्यांनी कार उभी केली. चालकाच्या मागील बाजूने दोघे उतरले. एकाने चैतन्यला उचलून चालकाच्या डाव्या बाजूने कारमध्ये कोंबले. दुसऱ्याने सायकल चालवत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन फेकली. त्यानंतर अपहरणकर्ते चैतन्यला घेऊन हनुमान चौकाच्या दिशेने सुसाट निघून गेले.

१५ मिनिटांत कॉल
सुनील मात्र चैतन्य लांब गेला असेल, या शंकेने परिसरात शोधत निघाले. तेवढ्यात त्यांच्या मोबाइलवर अनाेळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉलवरील व्यक्तीने त्यांना आधी मराठी व नंतर हिंदीतून 'बच्चा चाहिए तो २ करोड देना पडेंगे' असे सांगितले.
चोहोबाजूंनी नाकाबंदी

अपहरणाची घटना उघड होताच शहरासह सर्व जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला. कुटुंबाने पोलिस आयुक्तालयात धाव घेतली. आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशावरून जवळपास ३० पोलिस अधिकारी, १२० पेक्षा अधिक अंमलदार, सर्व ठाण्यांची डीबी पथके, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबरचे अधिकारी रस्त्यावर उतरले. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून अपहरणकर्त्यांचा माग काढला जात होता.

आधीपासूनच मोबाइल क्रमांक, सोसायटीची पुरेशी रेकी
अपहरणकर्त्यांकडे आधीपासूनच सुनील यांचा मोबाइल क्रमांक होता. अपहरणाच्या आधी त्यांनी त्यांच्या निवासस्थान व आसपासच्या परिसराची रेकी केली होती. अपहरणकर्ते सोसायटीत दुसऱ्या मार्गाने प्रवेश करत थेट सुनील यांच्या घरापर्यंत पाेहोचले. तेव्हा सुनील लहान मुलासोबत काही अंतरावर खेळत हाेते. त्याच रस्त्यावर चैतन्य सायकल खेळत होता. तो एकटाच मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताच अपहरणकर्त्यांनी त्याच्या मागे जात डाव साधला. हनुमान चौक ते कामगार चौकातून सिडको चौक व पुढे जळगाव रोडच्या दिशेने हर्सूल सावंगीच्या दिशेने कार गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहराच्या चारही बाजूंनी नाकाबंदी
 
-शहरासह चिकलठाणा, करमाड, जालना, पैठण, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर पोलिसांना नाकाबंदीचा आदेश देण्यात आला.
-सर्व टोलनाक्यांवर अपहरणकर्त्यांच्या कारचे वर्णन पाठवण्यात आले.

या दिशेने तपास पोलिसांचा विविध पथकांकडून तपास सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत परिसरातील बांधकाम साइटवरील मजूर, तुपे यांच्या बांधकाम साइटवरील कामगार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिस माहिती घेत हाेते. सुनील यांना कॉल केल्यानंतर अर्ध्या तासातच अपहरणकर्त्यांचा मोबाइल बंद झाला होता.

निकृष्ट दर्जाच्या सीसीटीव्हीमुळे अडचण
कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्याने पोलिसांना फुटेजमध्ये अडचणी आल्या. या कॅमेऱ्यात रात्रीची घटना नीट कैद झाली नाही. शिवाय, कारचा क्रमांकही दिसून आला नाही. सुनील यांचे सासरे राजकीय नेते असून, त्यांचे बांधकामासह विविध व्यवसाय आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.