अमली पदार्थ विरोधात राज्यात आदर्श ठरेल असे मॉडेल राबवावे
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अमली पदार्थ टास्क फोर्सच्या तिसऱ्या बैठकीत दिले निर्देश
सांगली, दि. 24: आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्रे, आदर्श शाळा हे सांगली जिल्ह्याचे उपक्रम राज्यस्तरावर वाखाणले गेले व त्याची राज्यभर अंमलबजावणी केली गेली. त्याचप्रमाणे व्यसन व अमली पदार्थाच्या विळख्यातून भावी पिढीचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्यात आदर्श ठरेल, असे मॉडेल तयार करावे व त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. यामुळे व्यसन व अमली पदार्थासंदर्भातील गुन्हेगारीचा समूळ नाश होईल, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.
अमली पदार्थ टास्क फोर्सच्या तिसऱ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये प्रार्थनेनंतर अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा, प्रबोधन गीत व व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे व्याख्यान किंवा चित्रफीत असा अतिरीक्त पण आवश्यक अभ्यासक्रम असलेला नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आगामी तीन महिन्यात शिक्षण विभागाने योग्य पद्धतीने नियोजन करावे. त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून आवश्यक परवानग्या घ्याव्यात, असा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य व अमली पदार्थांची विक्री न होण्यासाठी कडक पावले उचलावीत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी स्थापन टास्क फोर्सने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्योजकांच्या मागणीनुसार कारखानदारांकडून दर महिन्याच्या 5 तारखेला घ्यावयाच्या हमीपत्रास स्थगिती देण्यात आली. मात्र, या अनुषंगाने करारनाम्यात नियम समाविष्ट करण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू. एम आय डी सी क्षेत्रात सर्व कारखान्यांनी सी सी टी व्ही लावणे बंधनकारक करणे व अनेक वर्षे बंद कारखान्यांची जागा एम आय डी सी कडे परत घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.
अमली पदार्थ विरोधी लढ्यात दोषींवर कठोर कारवाई करावी, असा पुनरुच्चार करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थ संदर्भातील केस न्यायालयात कायदेशीरदृष्ट्या मजबूत पद्धतीने सादर होण्यासाठी कागदपत्रांच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व पूर्वखबरदारी घ्यावी, जेणेकरून दोषींना कठोर शिक्षा मिळेल. कारखाने तपासणी मोहिमेला गती द्यावी. तसेच बंद कारखानदारांना कर्जपुरवठा करणाऱ्या बॅंकांकडून थकबाकीचा सविस्तर अहवाल घेऊन, कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमिवर नागरिकामध्ये सुरक्षित सांगलीचा आत्मविश्वास निर्माण करावा, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अतिरीक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या अध्यक्षतेखाली दर आठवड्याला उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस उपअधीक्षक यांची बैठक घेऊन घटनानिहाय आढावा घ्यावा. अधिकाऱ्यांनाही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मानसशास्त्रीय दृष्ट्या दिलासा द्यावा. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गस्त वाढवावी, असे त्यांनी सांगितले.
स्वयंसेवी संस्थांनी पुढील आठवड्यात अमली पदार्थविरोधी प्रबोधनासंदर्भात सादरीकरण करावे. टास्क फोर्सच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीत गत आठवड्यात केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर व केसनिहाय आढावा सादर करावा, असे यावेळी सांगितले.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादरीकरण केले. बैठकीत अमली पदार्थ विरोधी कार्यवाही व कायदा सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.