कोल्हापूर : येथील सीपीआरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे उकळणाऱ्या आणि जिल्हाधिकारी, अधिष्ठाता यांच्या खोट्या सह्या करून बोगस आदेश देणाऱ्या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
नितीन अशोक कांबळे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) आणि नागेश एकनाथ कांबळे (रा. शेळेवाडी, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या दोघांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३३६ (३), ३३७, ३३९, ३(५) नुसार फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे, या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या दोघांनी संगनमत करून गायत्री जयवंत बारके व दिलीप गणपती दावणे यांच्याकडून सीपीआरमध्ये लिपिक / शिपाई पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले.
त्यांनी तगादा लावल्यानंतर या दोघांनी आयुक्त, जिल्हा विभाग रुग्णालय, कोल्हापूर यांना शिफारस केल्याचे बोगस पत्र तयार केले आणि त्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या खोट्या सह्या केल्या. ही बाब उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष कांबळे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, खंडेराव गायकवाड, गजानन परीट, प्रीतम मिठारी, मंगेश माने, किशोर पवार यांनी ही कारवाई केली.
पंधरा दिवसांनंतर कारवाई
पोलिस ठाण्यात तक्रार देऊन १५ दिवस झाले तरी तपास होत नव्हता. कागदपत्रांचे कारण पोलिस ठाणे आणि सीपीआरकडून सांगण्यात येत होते. यावर 'लोकमत'ने तपासात गांभीर्य नसल्याचे वृत्त गुरुवारी प्रकाशित केल्यानंतर शुक्रवारीच पोलिसांनी दोघांना अटक केली.
फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधा..
या आरोपींकडून सीपीआरमध्ये नोकरी लावतो म्हणून पैसे घेऊन कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तातडीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.