पुरोगामी महाराष्ट्राला अंधश्रद्धाळू, जातीयवादी बनवण्याचे षडयंत्र!
ॲड.श्रीनिवास बिक्कड
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी, समाजसुधारकांनी आणि जनतेने ज्या गोष्टी होऊ दिल्या नाहीत त्या आता महाराष्ट्रात राजरोसपणे सुरू आहेत.
ज्या गोष्टींशी आपला पक्ष, संघटना आणि आपले नाव जोडले जाऊ नये असे वाटायला पाहिजे त्या गोष्टींचे आणि घटनांचे खुलेआम समर्थन सुरू आहे.
देशाला दिशा देणारे, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक सुधारणांमध्ये अग्रेसर, साधू संताची, थोर विचारवंतांची भूमी ही महाराष्ट्राची देशातच नाही तर संपूर्ण विश्वात ओळख आहे. पण गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना आणि परिस्थिती पाहिली तर शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला उत्तरेतल्या राज्यासारखे बनवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी, समाजसुधारकांनी आणि जनतेने ज्या गोष्टी होऊ दिल्या नाहीत त्या आता महाराष्ट्रात राजरोसपणे सुरू आहेत. ज्या गोष्टींशी आपला पक्ष, संघटना आणि आपले नाव जोडले जाऊ नये असे वाटायला पाहिजे त्या गोष्टींचे आणि घटनांचे खुलेआम समर्थन सुरू आहे. महाराष्ट्राचे 'महान'पण संपवण्याचा हा सुनियोजित कट आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
अंधश्रद्धेच्या वाटेवर…
पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश अशा उत्तर भारतातल्या राज्यात दरबार आणि डेरे असणाऱ्या बाबांचे मोठे प्रस्थ आहे. आसाराम बापू, रामरहीम, रामपाल, बागेश्वर बाबा, प्रदीप मिश्रा अशा बाबा लोकांचे भक्त आणि अनुयायी लाखो, करोडोंच्या संख्येत आहेत. एवढी मोठी मते त्या बाबांकडे असल्यामुळे राजकीय नेते आणि पक्षांना त्यांची ताकद कळाली. त्यामुळे ते बाबांच्या आश्रयाला गेले आणि बाबांनीही आपल्या भक्तांच्या मतांची ताकद ओळखून राजकारण्यांशी युती केली. उत्तर भारतातले हे फॅड गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातही आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या एक वर्षापूर्वीपासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडून राज्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बागेश्वर बाबा, प्रदीप मिश्रा यांसारख्या बाबांचे मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रातले आणि राज्यातले सत्ताधारी पक्षाचे मंत्री उपस्थित राहत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा ज्या ठिकाणी झाली होती त्याच जागेवर दुसऱ्या दिवशी बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम होता. पंतप्रधानांच्या सभास्थळावरील भाजपचे बॅनर काढले आणि बागेश्वर बाबांचे बॅनर लावले. या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील महिलांना घेऊन येण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उचलली. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद पुरवली. मुलाला नोकरी लागेल या आशेने या माता-भगिनी मोबाइलवर या बाबांचे ऐकून त्यांनी सांगितलेली पूजा आणि उपाय करत आहेत. देशात अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणाविरोधी कायदा करणारा हाच महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न पडला आहे.
कायदा-सुव्यवस्थेवर जातीय अस्मितेचा उतारा…
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. महाराजांच्या सैन्यात मुस्लिमही होते. सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि एकात्मतेचा शिवरायांनी दिलेला एवढा अनमोल वारसा महाराष्ट्र खरेच जपतोय का? अशी परिस्थिती निर्माण झालीय का?
दोन महिन्यांपूर्वी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. दुसरी घटना परभणी शहरात संविधानाच्या विटंबनेनंतर निर्माण झालेल्या तणावानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये घरात घुसून आंबेडकरी अनुयायांना केलेली मारहाण आणि पोलीस कोठडीत झालेली सोमनाथ सूर्यवंशी या युवकाची हत्या. या दोन्ही घटना राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे निदर्शक आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे केलेली हत्या ही तर मानवतेला काळीमा फासणारी आहे. या हत्याकांडाचा सगळा घटनाक्रम भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत मांडला. तो सर्व ऐकून महाराष्ट्रात कायद्याचे नाही तर गुंडांचे आणि माफियांचे राज्य आले आहे, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. हे संपूर्ण प्रकरण विरोधकांसह सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरकसपणे लावून धरले. आरोपींना बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे अभय असल्याचे आरोप झाले. आरोपी आणि मुंडे यांची जात एकच असल्याने समाजमाध्यमांतून यावर जोरदार चर्चा झाली. मग बीड जिल्ह्यात एकाच जातीचे किती अधिकारी आहेत, यावर चर्चा घडू लागल्या. दुसरीकडे ज्यांच्यावर सातत्याने आरोप होत असताना मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन तिथल्या महंतांचा पाठिंबा मिळवत आपण एका समाजाचे नेते असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. दोन महिने उलटूनही या प्रकरणातला एक आरोपी अद्याप फरार आहे. बीड पोलीस, मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली एसआयटी त्याला शोधू शकली नाही. धनंजय मुंडेंवर काहीच कारवाई केली नाही, पण यात कोणालाही गृहखाते ज्यांच्याकडे आहे त्या मुख्यमंत्र्यांचे अपयश दिसत नाही.
गुन्हेगार आणि पोलिसांच्या अभद्र युतीमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. गृहमंत्र्यांची पोलीस प्रशासनावर पकड राहिली नाही. जिल्ह्याजिल्ह्यात माफिया टोळ्या तयार झाल्या आहेत. मटका, दारू, वाळू, जमीन माफियांसोबत पवनचक्की माफिया नावाची एक नवी गुन्हेगारी जमात उदयास आली आहे. काळ्या रंगाच्या गाड्यांमधून फिरणारे हे
माफिया कधी शशिकांत वारिसे यांच्यासारख्या प्रामाणिक पत्रकारांना गाडीखाली चिरडतात, तर कधी संतोष देशमुख सारख्या युवा सरपंचाचे अपहरण करून हत्या करतात. गेल्या १० वर्षांतील साडेसात वर्षे देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री होते. पण त्यांच्यावर महाराष्ट्राचा बिहार केल्याचे, बीडचा काबूल केल्याची जबाबदारी येत नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार आवाज उठवला. पण हेच सुरेश धस नाशिक येथे सरकारीदूत म्हणून परभणीहून मुंबईला निघालेल्या लाँग मार्चला सामोरे जाऊन सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांना निलंबित केले आहे आता त्यांना माफ करा, असे म्हणतात… त्यावेळी धक्का बसतो.
राज्यात प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी आणि गुन्हेगारी, संकटात असलेला शेतकरी, असुरक्षित असलेल्या महिला, मुली या विषयांवर कोणी गांभीर्याने चर्चा करायला तयार नाही. याउलट एखाद्या धर्म किंवा जातीविरोधात वक्तव्ये करायची, त्यातून नवीन वाद पेटवायचे आणि मूळ मुद्द्यावरून दुसरीकडे लक्ष वळवायचे हे प्रकार जोरात सुरू आहेत. जात, धर्म, पंथ विसरून आषाढी वारीमध्ये भक्तिरसात एकरूप होऊन चालणाऱ्या महाराष्ट्राला विभाजित करण्याचा डाव यशस्वी न होऊ देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
माध्यम समन्वयक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.