मुंबई : मुंबईच्या वांद्रे टर्मिनस परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका मोकळ्या ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलेवर हमाल म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने अमानुष अत्याचार केला आहे. पीडित महिला आपल्या एका नातेवाईकासोबत मुंबई फिरायला आली होती. यावेळी ती रेल्वेत झोपली असताना हमालाने
संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून
पोलिसांनी हमालाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत
आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या एका नातेवाईकासह मुंबई फिरायला आली होती. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने दोघांनी वांद्रे टर्मिनस परिसरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला दोघंही प्लॅटफॉर्मवर झोपले होते. त्यानंतर पीडित महिलेचा नातेवाईक काही कामासाठी तिथून बाहेर गेला. तेव्हा प्लॅटफॉर्मवर एकटीच महिला झोपली होती.
त्यानंतर महिलेला जास्त झोप येत असल्याने तिने बाजुलाच उभ्या असलेल्या मोकळ्या ट्रेनमध्ये झोपायला गेली. तेव्हा ट्रेनमध्ये तिथे कुणीच नव्हतं. दरम्यान, टर्मिनसवरील आरोपी हमालाने महिलेला ट्रेनमध्ये घुसताना पाहिलं. महिलेला डोळा लागताच आरोपी हमालही ट्रेनमध्ये घुसला. तिला एकटीला पाहून आरोपीनं तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.काही वेळानंतर पीडित महिलेचा नातेवाईक घटनास्थळी आला, तेव्हा तिने घडलेला सगळा प्रकार आपल्या नातेवाईकाला सांगितला. यानंतर दोघांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला, महिलेसोबत घडलेली आपबिती सांगितली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत आरोपीची ओळख पटवली आणि त्याला बेड्या ठोकल्या.एका महिलेवर अशाप्रकारे रेल्वेत अत्याचार झाल्याने रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा प्लॅटफॉर्मवरील सुरक्षादल कुठे गेले होते? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच या गुन्ह्यात इतरही कुणाचा सहभाग आहे का? त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.