विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला अनपेक्षित यश मिळालं. महाविकास आघाडीच्या अनेक भरोशाच्या जागा महायुतीने जिंकल्या. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा फटका बसला. ही सगळी ईव्हीएमची जादू असल्याचं म्हणत अनेक उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले होते. त्यानुसार आता पुण्यातील एका बहुचर्चित मतदार संघात फेर मतमोजणी होणार आहे.
हा मतदारसंघ आहे खडकवासला मतदारसंघ. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर
पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या एकूण 11 पराभूत उमेदवारांनी फेर
मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले होते.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ उमेदवार आणि काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी हे अर्ज भरले होते. बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील हा अर्ज भरला होता. मात्र काही दिवसांनी त्यांनी माघार घेतली. त्यापाठोपाठ भोर, पुरंदर व दौंड या तीन मतदारसंघांतील उमेदवारांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर इतर सहा पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम च्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यामुळे केवळ एकाच उमेदवाराने आपला फेर मतमोजणीचा अर्ज कायम ठेवला. उमेदवार आहेत काँग्रेसचे सचिन दोडके. सचिन दोडके यांच्या खडकवासला मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रतिरूप मतमोजणी जिल्हा निवडणूक शाखा करणार आहे. त्यामुळे या मतमोजणीत नेमकं काय समोर येतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
भाजपची हॅट्रिक
खडकवासला मतदारसंघांमध्ये भाजपचे भीमराव तापकीर, काँग्रेसचे सचिन दोडके आणि मनसेचे मयुरेश वांजळे यांच्या तिरंगी लढत झाली. या लढतीत भाजपच्या भीमराव तापकीर यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला. मात्र निवडणुकीच्या दिवशीच विजयाचे फ्लेक्स लावणाऱ्या सचिन दोडके यांना मतमोजणीवर शंका असल्याने त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. त्यानुसार आता ही मतमोजणी पार पडणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.