कोल्हापूर :-इंजेक्शनमधून विष टोचत व्यावसायिकाने संपवले जीवन: आर्थिक तोट्याचे कारण
कोल्हापूर : मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक तोट्यासह व्यवसायामध्ये आलेल्या अपयशामुळे राजीव मोहन भिंगार्डे (वय ४८, रा. ताराबाई पार्क) यांनी घरात आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
त्यांनी इंजेक्शनद्वारे हातातून विष टोचून स्वतःचे जीवन संपवल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या मृतदेहाशेजारी मिळून आलेल्या चिठ्ठीमध्येही त्यांनी आई-वडिलांसह मुलीची माफी मागितली आहे. या घटनेने कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः भिंगार्डे यांचे शिवाजी उद्यमनगरात चारचाकी वाहनांचे शोरूम आहे; मात्र, त्यांना व्यवसायात गेले काही दिवस मोठा आर्थिक तोटा बसला होता. त्यांनी काही ठिकाणी केलेली गुंतवणूकही बहूतांश प्रमाणात तोट्यात होती. अनेक दिवसांपासून त्यांचा मित्र, नातेवाइकांशी संवाद कमी झाला होता. आज सकाळी ते रूमबाहेर न आल्याने साडेनऊच्या सुमारास त्यांचे वडील रुमजवळ गेले. हाक देऊनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यावेळी राजीव भिंगार्डे बेशुद्धावस्थेत मिळून आले.
द्रव भरलेली भलीमोठी सीरिंज सापडली...
भिंगार्डे यांच्या मृतदेहाशेजारी भलीमोठी सीरिंज आढळली. तसेच त्यांच्या दंड व मनगटाजवळील भाग काळा पडल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी याची वर्दी पोलिसांना दिली. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळाहून बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये आणले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेहाशेजारी मिळालेले सीरिंज पूर्णपणे भरलेली होती. अत्यल्प प्रमाणात त्यातील द्रव पदार्थ भिंगार्डे यांच्या शरीरात गेल्याचे दिसून आले, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
तणनाशक की भुलीचे औषध....
सीरिंजमध्ये मिळालेले द्रव पोलिसांनी ताब्यात घेतले. ते तणनाशक आहे की भुलीचे औषध हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी यातील काही नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. हा अहवाल आल्यानंतरच द्रव पदार्थ नेमका काय होता, हे स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.
बहिणीला मानसिक धक्का
राजीव यांच्या आईंची दोन महिन्यांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना पाहण्यासाठी लंडनहून राजीव यांची बहीण आज सकाळी विमानाने गोव्यात पोहोचली. सायंकाळी त्या कोल्हापुरातील घरी आल्या असता घराबाहेर गर्दी पाहून त्या घाबरल्या. आपल्या भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी त्यांना घरात प्रवेश करण्याआधीच कानावर पडल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. राजीव यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
मला माफ करा!
मी चांगला मुलगा, चांगला पती, चांगला बाप होऊ शकलो नाही. मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना झालेल्या त्रासाबद्दल मला माफ करा... अशा आशयाची चिठ्ठी राजीव यांनी मृत्यूपूर्वी लिहिली होती. मृतदेहाजवळ मिळालेली चिठ्ठी पोलिसांनी तपासकामी ताब्यात घेतली आहे. चिठ्ठीमध्ये मोबाईलचा पिन नंबर, एटीएमचा पिन नंबर, ई-मेल आयडी पासवर्ड अशी माहितीही लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.