भारतात अनेक वर्षांपासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याचीही अशा लग्नाला मान्यता आहे. त्यात मामाची मुलगी- आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे. महाराष्ट्रात जवळपास 25 टक्के लग्न हे जवळच्या नात्यामध्ये होतात. त्यात विशिष्ट समाजात याचे प्रमाण खूप जास्त आहे.
मात्र, अशी लग्ने करू नयेत किंवा त्यांचे काही तोटे आहेत, असे सिद्ध करणारे कोणतेही शास्त्रीय पुरावे आतापर्यंत उपलब्ध नव्हते. जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते. इतर आरोग्यविषयक समस्या जास्त असू शकतात. मात्र, या गोष्टीला वैज्ञानिक आधार नसल्याने नात्यामधील लग्नांना उत्तेजन दिले जाते. मात्र, अशी लग्ने करू नयेत किंवा त्यांचे काही तोटे आहेत, असे सिद्ध करणारे कोणतेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नव्हते.
नात्यात लग्न केल्यामुळे काय होतं…? संशोधन अहवाल प्रसिद्ध
आता मात्र तसे संशोधन आणि पुरावे उपलब्ध झाले आहेत. यासंदर्भातील अभ्यास हा मॉलिक्युलर जेनेटिक्स आणि जिनॉमिक्स या संशोधनपत्रिकेमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हे संशोधन परळ येथील जनुकीय संशोधन केंद्रामध्ये, आयसीएमआर, एनआयआरआसीएच येथील संस्थेने प्रसिद्ध केले आहे. या संशोधनात्मक अभ्यासाठी 66 जोडप्यांची निवड करण्यात आली होती. त्यांचे जनुकीय समुपदेशन तसेच वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यातील 58 जोडप्यांमध्ये ‘कायरोटापिंग’ ही जनुकीय चाचणीही करण्यात आली. या चाचण्यानंतर केलेल्या विश्लेषणातून ३१ टक्के जोडपी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या आनुवंशिक विकाराचे वाहक असल्याचे आढळून आले.
रक्ताचा संसर्ग वा कोणत्याही स्वरूपाच्या आनुवंशिक आजाराचे ते वाहक आहेत का, याचे जनुकीय समुपदेशन करण्यात आले होते. त्यामुळे या जोडप्यांना पालकत्वाचा निर्णय घेण्याबद्दल विचार करण्यासाठी मदत झाली. अशा प्रकारच्या नात्यातल्या लग्नामध्ये आनुवंशिक दोष पुढील पिढीमध्ये येण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्ताच्या संसर्गासह, चॅलेसेमिया, सिकलसेल, मतीमंदत्व, चयापचय स्थिती, वेगवेगळ्या मानवी प्रणालीमधील दोष अशाप्रकारची लक्षणे या जोडप्यांमधील बाळांमध्ये येऊ शकतात.
सुमारे सत्तर टक्के जन्मजात व्यंगाचे योग्य जनुकीय समुपदेश आणि जन्मजात दोषांचे चाचण्यामुळे निदान होऊ शकते. मात्र यासंदर्भात त्यांना कोणतीही माहिती नसते. या अभ्यासामुळे या विषयाला गती मिळेल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कॅरियोटायपिंग, मायक्रोॲरे आणि संपूर्ण एक्सोम सिक्वेन्सिंग या प्रकारच्या चाचण्यांचा वापर जनुकीय समुपदेशनप्रक्रियेमध्ये करण्यात येतो. जनुकीय आजार शोधण्यासाठी करण्यात येणारी ही विशिष्ट चाचणी आहे.
27 जोडप्यांच्या बाळाची पुरेशी वाढ नाही
नात्यामध्ये विवाह केलेल्या या जोडप्यांना अशाप्रकारचा जनुकीय दोष निर्माण होऊ शकतो, याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात कोणतीही मदत वा समुपदेशन घेतले नाही. यातील सत्तावीस जोडप्यांच्या बाळाची पुरेशी वाढ न होणे, अपुऱ्या दिवसांत गर्भपात किंवा मृत्यू होण्यामागील नेमक्या वैद्यकीय कारणांचे विश्लेषण त्यांना करता आलेले नाही.
यातील 49 जोडप्यांना जनुकीय चाचण्या तसेच दोषासंदर्भात कोणतीही माहिती नव्हती, तर सात जोडप्यांनी जनुकीय समुपदेशनासंदर्भात पूर्वकल्पना असल्याचे सांगितले. 51 जणांना त्यांच्या डॉक्टरांनी या संदर्भात मदत घेण्यासाठी सुचवले होते. तर 58 पैकी 28 जोडप्यांनी बाळाचा जन्मजात मृत्यू, गर्भपात झाल्याचे सांगितले. हा दोष नेमका कशामुळे निर्माण झाला याची माहिती नसलेल्या 48 टक्के जोडप्यांनी पुन्हा गर्भपात होत असल्याने यासंदर्भातील कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता.जनुकीय विश्लेषक डॉ. शैलेश पांडे यांच्या मते जनुकीय व्यंग तसेच दोष टाळण्यासाठी अशाप्रकारच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. त्या न झाल्यास पुढील पिढीमध्ये दोष निर्माण होऊ शकतात. ग्रामीण तसेच शहरी भागातील जोडप्यांमध्ये जनजागृती नसते. काहीजण वैद्यकीय उपचार सुरू करून ते अर्धवट सोडून देतात. या अभ्यासामुळे जनुकीय चाचण्या नेमक्या कोणामध्ये कशाप्रकारे कराव्यात यासंदर्भात नियमावली तयार करण्यास मदत होईल, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.
डॉ. अमोल अन्नदाते यांनी नातेसंबंधातील लग्नाबद्दल सांगितले की, नात्यामधील लग्नांना वैद्यकीय भाषेत ‘कॉनसॅनग्यूनस मॅरेज’ असे म्हणतात. त्यात तीन प्रकार आढळून येतात. फर्स्ट डिग्री : म्हणजे काका, मामा, पुतणी, मावसबहीण यांच्यातील विवाह, सेकंड डिग्री म्हणजे मावस किवा चुलत भाऊ बहिणीमधील विवाह व थर्ड डिग्री म्हणजे मामाची मुलगी व आत्याच्या मुलामधील विवाह. याशिवाय थेट रक्ताचे नाते असलेल्यांमध्ये विवाह झाल्यास तोही कॉनसॅनग्यूनस मॅरेजमध्ये येतो.
नात्यातील लग्नामध्ये कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
प्रजननशक्तीवर परिणाम होऊ शकतो.गर्भपाताचे प्रमाण वाढू शकते.स्टील बर्थ (बाळाचे गर्भातील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते)नात्यामधील लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये काय समस्या येऊ शकते ?अशा पालकांच्या मुलांमध्ये आनुवंशिक आजाराचे प्रमाण 25 टक्के असू शकते.त्यातच अॅटोझोनल रेसेसिव्ह आजारांचे प्रमाण जास्त असते. नात्यातील लग्नातून झालेल्या मुलांचा बुद्ध्यांक इतर मुलांपेक्षा कमी असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
बाळांमध्ये आनुवंशिक आजारांचे प्रमाण जास्त का आढळून येते?
याचा वैज्ञानिक आधार समजून घेणे गरजेचे आहे. जवळच्या नात्यातील वर-वधूमध्ये जवळपास 25 ते 50 टक्के जेनेटिक मटेरियल म्हणजे जनुकीय साहित्य सारखे असते. कोणतेही आजार प्रकट होण्यासाठी त्या आजाराचे दोन सदोष जनुक एकत्र येणे गरजेचे आहे. हे सदोष जनुक एकत्र येऊन प्रकट होतात व अपत्यामध्ये हा आजार दिसून येतो; पण दोन वेगळ्या जनुकीय संबंध नसलेल्या कुटुंबातील व्यक्तीमध्ये असे होण्याची शक्यता नगण्य असते.
त्या जोडप्याने काय काळजी घ्यावी?
ज्यांचे लग्न नात्यात झाले आहे त्यांनी घाबरून जाऊ नये; पण आनुवंशिक आजार टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी. गरोदर राहण्याचा निर्णय घेताना त्याआधी तीन महिने फोलिक अॅसिड, सप्लिमेंट्स घ्याव्यात. जेनिटिक कौन्सिलर किंवा आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांना नात्यात लग्न झाल्याचे सांगून सल्ला घ्यावा. 14 ते 16 आठवड्यांनी ट्रिपल टेस्ट करून घ्यावी. 20 ते 22 आठवड्यांनी फोर डायमेन्शनल सोनोग्राफी (अॅनामोली स्कॅन) करून घ्यावी. गेल्या दशकात भारतात आनुवंशिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या आजारांना कोणतेही उपचार नाहीत. ते टाळणे हाच एकमेव पर्याय आहे. कोणी कोणाशी लग्न करावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत व भावनिक मुद्दा असला तरी पुढील पिढ्यांचे नुकसान टाळलेले बरे!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.