बिहारमधील काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते डॉ. शकील अहमद खान यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे खान यांचं कुटुंब धक्क्यात आहे. अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करून या घटनेबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शकील अहमद खान आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
आयान जाहिद खान (१७-१८ वर्षे) या शकील अहमद खान यांच्या एकुलत्या एक मुलाने शासकीय बंगल्यातील त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. सकाळी त्याच्या खोलीतून तो बाहेर न आल्यामुळे कुटुंबियांनी तपास करताना त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासासाठी एफएसएलचं पथकही घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.
शकील अहमद खान यांचं शासकीय निवासस्थान सचिवालय पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं. या घटनेची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी आता तपास सुरू आहे. शकील अहमद खान हे बिहारमधील काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आहेत. ते कटिहार जिल्ह्यातील कदवा मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०२० च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला होता. यंदा ते तिसऱ्यांदा निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसचे राज्यात सध्या केवळ १९ आमदार आहेत, त्यापैकी शकील खान हे एक प्रमुख नेते मानले जातात.शकील अहमद खान हे मूळचे कटिहार जिल्ह्यातील कबर कोठी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी पाटणा विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी एमए, एम फिल व पीएचडी पूर्ण केली आहे. १९९९ साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याने ठसा उमटवला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.