मुंबई: रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर बीचवर एका ३७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिला हरिहरेश्वर बीचवरील एका खडकावर बसली होती. पण अचानक विपरीत घडून महिलेचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अवघ्या पाच मिनिटांतच
होत्याचं नव्हतं झालं. पल्लवी सरोदे असं मयत महिलेचं नाव असून त्या
ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक सिंगारे यांच्या पीए होत्या. अलीकडेच त्यांना
प्रोमोशन देखील मिळालं होतं. पिकनीकला गेल्यानंतर घडलेल्या एका दुर्घटनेत
अशाप्रकारे पल्लवी यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात
आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत पल्लवी
सरोदे या आपल्या काही ऑफिसमधील मैत्रिणींसोबत रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर
बीचवर फिरायला गेल्या होत्या. सकाळी आठ वाजता सगळ्यांनी मंदिरात जाऊन
दर्शन घेतलं. यानंतर पावणे नऊच्या सुमारास पल्लवी यांच्यासह त्यांच्या सर्व
मैत्रिणी हरिहरेश्वर बीचवर आल्या. इथं सर्वांनी समुद्राचा आनंद लुटला.
यावेळी पल्लवी समुद्राच्या आतमध्ये असलेल्या एका खडकावर चढल्या आणि तिथे
जाऊन बसल्या.
तिथे बसणं रिस्की असल्याचं मैत्रिणींच्या लक्षात आलं. त्यांनी पल्लवी यांना खडकावरून खाली उतरण्यास सांगितलं. पण पल्लवी यांनी काहीच ऐकलं नाही. त्या तशाच खडकावर बसून राहिल्या. पण पुढच्या काही मिनिटात आलेल्या एका मोठ्या लाटेमुळं पल्लवी यांचा समतोल बिघडला आणि त्या थेट समुद्रात पडल्या. हा सगळा प्रकार पाहून पल्लवी यांच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केला. त्यांनी स्थानिकांकडून तातडीने मदत मागितली.पुढच्याच पाचच मिनिटांत स्पीड बोट घटनास्थळी रवाना झाली. त्यांनी पल्लवी यांना पाण्यातून बाहेर काढलं. पण या पाच मिनिटांत सगळंच संपलं होतं. पल्लवी यांच्या नाका तोंडात पाणी शिरून त्या बेशुद्ध झाल्या होत्या. स्थानिकांनी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण काहीच उपयोग झाला नाही. त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे स्थानिकांनी तातडीने पल्लवी यांनी श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. इथं डॉक्टरांनी पल्लवी यांनी मृत घोषित केलं. पल्लवी यांच्या पाश्चात पती आणि १३ वर्षांचा मुलगा आहे. पल्लवी यांचं वर्षभरापूर्वी प्रोमोशन देखील झालं होतं. करियरच्या पीकवर असताना महिलेचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.