उन्हाळा आणि ग्रामीण भागातील जत्रांचा सीझन हे समिकरण जणू काही ठरलेलं असतं. महाराष्ट्रातील अनेक गावांच्या जत्रा या उन्हाळ्याच्या आसपासच होतात. उन्हाळ्यामध्ये फारशी शेतीची कामं नसतात त्यामुळेच या कालावधीमध्ये जत्रांचं आयोजन केलं जातं.
मात्र अनेकदा गावाकडील जत्रांबद्दल बोलताना जत्रा आणि यात्रा हे दोन्ही शब्द वापरेल जातात. हे दोन्ही शब्द एकमेकांना पुरक म्हणून वापरले जात असले तरी त्यांचा अर्थ मात्र वेगळा आहे. आपल्यापैकी 99 टक्क्यांहून अधिक लोक जत्रा आणि यात्रा हे दोन्ही शब्द वाटेल तसे वापरतात. मात्र या शब्दांचा नेमका अर्थ काय हे जाणून घेऊयात...
एकमेकांना पुरक म्हणून वापरले जातात शब्द
सामान्यपणे दोन्ही शब्दा एकाच अर्थाने वापरले जात असले तरी काहीवेळा वापरात फरक दिसून येतो. अनेकदा हे शब्द वापरण्याचे संदर्भही बदलू शकतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यात्रा ही प्रवास करण्याची क्रिया असते तर जत्रा हा एखाद्या ठराविक ठिकाणी उत्सवासाठी जमणारी गर्दी. म्हणजेच यात्रा हे नेहमी पर्यटन असते तर जत्रा म्हणजे मेळावा असतो. यात्रा करणारे नेहमीच लांबून येतात तर जत्रा ही स्थानिक असू शकते. जत्रा हा नेहमीच उत्सव किंवा गर्दीचा भाग असतो. वैयक्तिक यात्रा ही उत्सवाशिवाय केव्हाही करता येते. यात्रा ही धार्मिक कारणासाठी अथवा विधीसाठी असते. तर जत्रा ही मेळावा, आनंदासाठी, व्यापारासाठी, देवस्थानाभोवती असते.
यात्रा आणि जत्रामधील फरक काय?
यात्रा हा स्रीलिंगी शब्द असून त्याचा अर्थ देवतादर्शन, तीर्थस्थान इत्यादीकरता निरनिराळ्या पुण्यक्षेत्री जाऊन तेथे तीर्थस्नान, देवदर्शन, क्षौर, ब्राह्मणभोजन इत्यादी विधि करणे असा होता. यात्रेकरूंचा समुदाय-समूह असतो. उदाहरण : आज त्या देवाची यात्रा आहे म्हणून सर्व दुकाने तिकडे गेली. तसेच फुकट पडलेला हेलपाटा किंवा निष्कारण प्रवास झाला तरी त्याला यात्रा असं म्हणतात. उदाहरण : ज्या कामाच्या उद्देशाने मुंबईस गेलो ते झाले नाही, उगीच यात्रा घडली. देशांतरास गमन; संचार; पर्यटणालाही यात्रा असं म्हणतात. यात्रकरू, यात्रस्थ, यात्रेकरी-रू, यात्रिक असे शब्दही वापरले जातात. यात्रा करणारा, तीर्थक्षेत्रास जाणारा, वारकरी असे शब्दही यात्रा करणाऱ्यांसाठी वापरले जातात असं 'दाते शब्दकोशात म्हटलं आहे. जत्रा हा सुद्धा स्रीलिंगी शब्द आहे. याचा अर्थ देवासाठी उत्सवाच्या काळात जमलेला मेळा असा होतो. यात्रेकरुंचा मेळा अशीही जत्रेची ओळखता सांगता येईल.
यात्रा
विशिष्ट उद्देशाने (देवदर्शनासाठी वगैरे) एखादी व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर त्याला यात्रा म्हणतात. आधुनिक काळात हा शब्द राजकीय, पर्यावरणवादी किंवा सामाजिक कारणांसाठी मोर्चे किंवा निदर्शने दर्शवण्यासाठी वापरला जाऊ लागला आहे. संस्कृत भाषेत यात्राचा अर्थ मिरवणूक किंवा प्रवास असा होतो. उदाहरण : पंढरपूरची यात्रा
जत्रा
जत्राची साधारण व्याख्या करायची झाल्यास, विशिष्ट ठिकाणी काही विशेष कारणांसाठी वर्षातील विशेष कालावधीसाठी लागणारा अस्थायी बाजार व करमणूक असं म्हणता येईल. एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा किंवा मेळा असे म्हणतात. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने गावांमध्ये जानेवारी ते मे महिन्यांमध्ये जत्रांचं आयोजन केलं जातं. उदाहरण : अंगणेवाडीची जत्रा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.