कोल्हापूर : टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्या भरधाव मोटारीने उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कार, रिक्षांसह नऊ वाहनांना उडविले. या भीषण दुर्घटनेत राजारामपुरी येथील उद्योजक धीरज शिवाजीराव पाटील (वय 55, रा.राजारामपुरी, पाचवी गल्ली) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा थरार घडला. मोटार चालवत असतानाच धीरज पाटील यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने हा अपघात झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पाटील यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी दोन वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
टाकाळ्याकडे जाणार्या चौकाजवळ भरधाव मोटारीवरील पाटील यांचे नियंत्रण सुटले. उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या एका बाजूला पार्क केलेल्या वाहनांना जोरात ठोकर दिल्यानंतर पुढे याच रस्त्यावर कचरा कोंडाळ्याजवळ जाऊन मोटार थांबली. अपघाताच्या कानठळ्या बसवणार्या आवाजामुळे परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे रिक्षा, मोपेड, दुचाकीसह वाहनांच्या सुट्ट्या भागांचा खच रस्त्यावर पडला होता. धीरज पाटील चालकाच्या सीटवरून शेजारील सीटवर फेकले गेले होते. तरुणांनी तत्काळ पोलिसांंशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक दत्तात्रय भोजणे यांच्यासह राजारामपुरी व शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह शाहूपुरी पोलिसांची गस्ती पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांच्या मदतीने स्थानिक नागरिकांनी धीरज पाटील यांना तत्काळ रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस कॉन्स्टेबल दिगंबर कुंभार यांनी पंचनामा करून पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.
वर्दळ कमी झाल्याने अनर्थ टळला
उड्डाणपुलाशेजारी नागरी वस्ती असल्याने रात्री उशिरापर्यंत तेथे वर्दळ सुरू असते. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत परिसर गजबजलेला होता. नागरिकांची वर्दळ कमी झाल्यानंतर काही वेळात हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांनी सांगितले. बहुतांशी वाहनांचे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. दोन मोपेड व दुचाकींचा चेंडूसारखा आकार झाला होता.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
धीरज पाटील यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व मित्र परिवाराने पहाटे घटनास्थळासह राजारामपुरी पोलिस व रुग्णालयाकडे धाव घेतली. नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. तपासणीमध्ये व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. राजारामपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, धीरज पाटील हे शुक्रवारी रात्री ताराबाई पार्क परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथून मध्यरात्री दोनच्या सुमारास टेंबलाई नाका, टाकाळामार्गे राजारामपुरी येथील निवासस्थानाकडे मोटारीतून जात होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.