सांगली : एकमेकांची तक्रार करू; दोहोंचेही अतिक्रमण पाडू
सांगली : येथील विश्रामबागमधील त्रिमूर्ती अपार्टमेंटमधील एका रहिवाशाच्या तक्रारीनुसार महापालिकेच्या पथकाने जिन्यातील ग्रील तोडले, तर ज्यांचे ग्रील निघाले, त्यांच्या अर्जावरून तक्रारदाराचे साईड मार्जिनमधील पत्र्याच्या शेडचे बांधकाम पाडण्यात आले. एकमेकांची तक्रार करू, दोहोंचेही अतिक्रमण पाडू, असाच जणू प्रकार घडला. विश्रामबाग येथील गणपती मंदिराच्या पाठीमागील बाजूस त्रिमूर्ती अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमधील एका नागरिकाने फ्लॅटच्या दारासमोर जिन्यात अन्य एका रहिवाशाने लावलेल्या ग्रीलबाबत लोकशाही दिनात तक्रार केली. त्यावर सुनावणी झाली. दरम्यान, हे अतिक्रमण पाडण्याचे आदेश महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला मिळाले. दरम्यान, ज्यांनी ग्रील उभारले होते, त्यांनी तक्रारदाराविरोधात अर्ज केला.
तक्रारदाराने साईड मार्जिनमध्ये पत्र्याच्या शेडचे बांधकाम केल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने ही दोन्ही अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमणविरोधी विभागाचे अधीक्षक दिलीप घोरपडे, पथकातील विक्रम घाडगे व कर्मचारी मंगळवारी त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये पोहोचले. पथकाने जिन्यातील ग्रील तोडले. त्याचबरोबर साईड मार्जिनमधील पत्र्याच्या शेडचे बांधकामही तोडले. त्याची चर्चा परिसरात सुरू होती. वसंत कॉलनी येथेही एकाच्या तक्रारीवरून साईड मार्जिनमधील बांधकाम महापालिकेच्या पथकाने तोडले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.